सत्ताधारी शिवसेनेत बेबनाव?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:27 AM2018-01-18T00:27:21+5:302018-01-18T00:27:40+5:30
महिला-बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मंगळवारी शिवसेनेच्या दीपाली पाटील बिनविरोध निवडून आल्या असल्या, तरी...
कल्याण : केडीएमसीच्या महिला-बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मंगळवारी शिवसेनेच्या दीपाली पाटील बिनविरोध निवडून आल्या असल्या, तरी डोंबिवलीला हे पद गेल्याने समितीच्या कल्याणमधील शिवसेनेच्या सदस्या नाराज झाल्या आहेत. दरम्यान, कोणतीही नाराजी नसल्याचा दावा पक्षाचे महापालिका गटनेते रमेश जाधव यांनी केला आहे.
महिला व बालकल्याण समितीत ११ सदस्या आहेत. यात शिवसेनेच्या पाच, भाजपाच्या चार आणि काँग्रेस, मनसेचा प्रत्येकी एक सदस्या आहेत. महिला-बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक मंगळवारी झाली. या वेळी उमेदवारी देताना पक्षातील अन्य इच्छुकांना विश्वासात घेतले नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काही सदस्या नाराज आहेत. काहींनी निवडणुकीला न जाणे पसंत केले. विशेष म्हणजे समितीमधील शिवसेनेच्या पाचपैकी चार सदस्या या कल्याणच्या आहेत. स्थायीचे गत सभापतीपद डोंबिवलीकडे गेले होते. त्यामुळे ‘महिला-बालकल्याण’चे सभापतीपद कल्याणला मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, डोंबिवलीच्या दीपाली पाटील यांना उमेदवारी दिली गेल्याने इच्छुक सदस्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.
आगामी महापौरपद भाजपाकडे जाणार आहे, परंतु त्यानंतर हे पद पुन्हा शिवसेनेकडे येणार आहे. त्या वेळी लोकसभेच्या निवडणुकांचा काळ पाहता त्या पदावर डोंबिवलीकरांचीच वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. डोंबिवलीलाच मानाची पदे मिळत असल्याची चर्चा कल्याणकरांकडून दबक्या आवाजात सुरू आहे. महिला बालकल्याण समिती सभापतीपदाच्या निवडणुकीतही डोंबिवलीतील एका गटाचे वर्चस्व राहिल्याचे बोलले जात आहे. समितीतील काही महिला सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’कडे नाराजी व्यक्त केली.
याप्रकरणी गटनेते जाधव म्हणाले, समितीच्या सदस्यांमध्ये कोणतीही नाराजी नाही. पाटील यांची निवड बिनविरोध झाली आहे. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच नाही. जे नाराज असतील, त्यांची नाराजी दूर केली जाईल, असेही ते म्हणाले.