हसनैनच्या घराबाबत उठलेय अफवांचे पीक

By admin | Published: March 26, 2016 02:55 AM2016-03-26T02:55:49+5:302016-03-26T02:55:49+5:30

कासारवडवलीतील हसनैन वरेकर या क्रुरकर्म्याने १४ जणांचे हत्याकांड घडवले त्या घटनेला रविवारी एक महिना पूर्ण होत आहे. वरेकर याच्या त्या घराबाबत वेगवेगळ््या अफवांचे पीक

Rumors of rumors about Hasnain's house | हसनैनच्या घराबाबत उठलेय अफवांचे पीक

हसनैनच्या घराबाबत उठलेय अफवांचे पीक

Next

- जितेंद्र कालेकर,  ठाणे
कासारवडवलीतील हसनैन वरेकर या क्रुरकर्म्याने १४ जणांचे हत्याकांड घडवले त्या घटनेला रविवारी एक महिना पूर्ण होत आहे. वरेकर याच्या त्या घराबाबत वेगवेगळ््या अफवांचे पीक परिसरात आले आहे. त्यामुळे परिसरातील लोकांनी मृतात्म्यांना शांती मिळण्याकरिता ‘कुराणखानी’ केली. परिसरातील काहींच्या मनावर हत्याकांडाच्या आठवणींनी गंभीर आघात केल्याने काहींच्या घरात आजारपण सुरु झाले तर काहींचे जमलेले विवाह मोडले. वरेकर यांच्या त्या घराच्या ठिकाणी मदरसा सुरु करण्याचा प्रस्ताव रहिवासी रेटत आहेत.
गावात फेरफटका मारला असता हसनैनच्या शेजारी आणि नातेवाईक शाहीस्ता वरेकर यांनी त्या घटनेमुळे मनावर जबरदस्त आघात झाल्याचे सांगितले. आपली मुलगी शिफा (१८) हिला अनेक दिवस ताप येत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले.
शिफाने हसनैनला हातात सुरा घेऊन सुबियाला दरवाजा उघडण्याकरिता धमकावताना पाहिलं होतं. वरेकरांचे घर शाहिस्ता यांच्या घराला लागून आहे. रात्रीच्या वेळी ते घर खिडकीतून दिसू नये याकरिता पडद्याला उशा लावून पॅक करतो, असं त्यांनी सांगितलं.
हसनैनच्या घराकडे सायंकाळनंतर कुणी फारसे फिरकत नाही. त्या घराकडे पाहिले तरी भीषण हत्याकांडाची अनेकांना आठवण होते. रात्री अंधारात भीती वाटू नये म्हणून त्या घराचे मागील बाजूचे दिवे आता अहोरात्र चालू ठेवण्यात आले आहेत. बँकेत चांगल्या पदावर नोकरीला असलेल्या शेहबाज शेख याची नुकतीच जमलेली सोयरिक या घटनेनंतर तुटली. काहीच कारण न देता मुलीकडच्यांनी या गावात मुलगी देण्यास नकार दिला. शेहबाज कुटुंबियांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. करणाऱ्याने खून केले, यात आमचा काय दोष? इतकेच शेख कुटुंब नाराजीनं बोलले.

हसनैन पळाला असता तर....
सुबियाच्या आरड्याओरड्यामुळं जाग आल्यावर आम्ही हसनैनला बघितले. त्यामुळे आपण आता पकडले जाऊ या भीतीने त्याने आत्महत्या केली. मात्र हे हत्याकांड करून तो पळाला असता तर... ही कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. हसनैनचा छडा लागेपर्यंत पोलिसांनी आजूबाजूच्या तरुण पोरांना नाहक त्रास दिला असता. चौकशीचा ससेमिरा पाठी लावला असता, अशी प्रतिक्रिया परिसरातील काही तरुणांनीच दिली.

भीती टाळण्यासाठी ‘कुराणखानी’ केली
गेल्या महिनाभरात अफवांना ऊत आलाय रात्री कुणीतरी भटकत... वरेकरांच्या घरातील नळ आपोआप चालू होतात, अशा बेलगाम गावगप्पांनी कळस गाठलाय. इस्लाममध्ये ‘रु’ अर्थात आत्मा भटकणे वगैरे मानले जात नाही.
तरीही लोकांमधील भीती कमी होण्यासाठी ‘कुराणखानी’ (मृतात्म्यांना शांती मिळण्यासाठी त्यांनी केलेल्या पापातून त्यांना मुक्ती मिळण्यासाठी पवित्र कुराणाचे पठण) केल्याचे हसनैनचे चुलत भाऊ बासीद वरेकर यांनी सांगितले. अशा अफवा पसरवणाऱ्यांचा पोलिसांनी बंदोबस्त केला पाहिजे, असे ते म्हणाले.

चर्चेमुळे वस्तीत राहणाऱ्यांमध्येच भीती
आम्ही आपआपल्या कामात व्यग्र असतो. मात्र काहीजण याच परिसरात वास्तव्य करतात.
अफवांमुळे त्यांना विनाकारण भीती वाटते, असे सुबियाला वाचविण्यासाठी धाव घेणारा अल्तमश वरेकर यांनी सांगितले.
--------------------------------------------

हत्याकांडाशी जोडलेली ओळख भरमल कुटुंबियांना सतावतेय
- पंढरीनाथ कुंभार, भिवंडी
कासारवडवलीतील भीषण हत्याकांडातून कशीबशी वाचलेली एकमेव साक्षीदार सुबिया सोजेब भरमल हिला गाठण्याकरिता म्हापोलीतील तिच्या बंगल्यात गेल्यावर कुटुंबियांनी हात जोडून आमच्याकरिता तो विषय संपला असल्याचे सांगितले. महिनाकसा काढला ते आमचे आम्हाला ठावूक. आजूबाजूचे रहिवासी, रिक्षा चालक, बघे हे बंगल्याबाहेर उभे राहून बोटांनी ‘हेच ते सुबियाचे घर’, अशा खाणाखुणा करतात तेही भरमल कुटुंबाला असह्य होतं.
हसनैन वरेकर याने महिनाभरापूर्वी म्हापोलीतील भरमल यांच्या याच बंगल्यात येऊन बहिण सुबिया व तिची मुलगी अरसीया यांना रिक्षांतून ठाण्यातील कासारवडवलीत नेले. हत्याकांडातून सुबिया वाचली मात्र तिची मुलगी अरसीया हिची हत्या झाली. सुबियाच्या मानेला झालेली जखम हळूहळू भरत असली तरी मुलीची हत्या झाल्याचे दु:ख पचवणे तिला जड जात आहे. त्या रात्री सुबियाची जाण्याची इच्छा नव्हती.
हसनैनने आग्रह केल्यामुळे ती गेली. खरोखरच आपण अंतर्मनाचा आवाज ऐकला असता आणि थांबलो असतो तर अरसीया वाचली असती, अशी बोच सुबियाच्या मनाला जाणवत असल्याचे भरमल कुटुंबाच्या म्हापोलीतील निकटवर्तीयांनी सांगितले.
म्हापोलीत तळमजल्याचे बांधकाम झालेल्या या बंगल्यात भरमल परिवार राहतो. बंगल्याच्या वरच्या मजल्याचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. बंगल्यातील व्यक्तींनी आपापली ओळखही करून देण्यास नकार दिला. बंगल्याबाहेर मोठे मैदान असूनही घरातील मुले तेथे खेळत होती. म्हापोलीतील नागरिकांना भरमल कुटुंबाबत सहानुभूती आहे.

Web Title: Rumors of rumors about Hasnain's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.