ठाण्यात बॉम्बच्या अफवेने रेल्वे स्थानक परिसरात घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 10:18 PM2018-05-02T22:18:58+5:302018-05-02T22:18:58+5:30
ऐन गर्दीच्या ठिकाणी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एका बॅगेत बॉम्ब असल्याच्या वृत्ताने बुधवारी दुपारी एकच खळबळ उडाली. पोलीस बॅगेची खातरजमा करेपर्यंत अनेकांची भीतीने गाळण उडाली होती.
ठाणे : ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील ऐन गर्दीच्या ठिकाणी एक बेवारस बॅग सापडली. त्यात बॉम्ब असल्याच्या शक्यतेमुळे बुधवारी दुपारी एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या बॉम्बशोधकनाशक पथकातील श्वान ‘टायगर’ने यात ‘तसे’ काहीही नसल्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांसह नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.
नौपाड्यातील दादा पाटीलवाडी परिसरातील कोटक महिंद्रा बँकेसमोर एक बेवारस बॅग असून त्यात बॉम्ब असल्याची माहिती दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास नौपाडा पोलिसांना मिळाली. ही माहिती ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाकडेही देण्यात आली. नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनीही त्याठिकाणी भेट देऊन गर्दीवर नियंत्रण आणले. त्यानंतर, बॉम्बशोधकनाशक पथकाचे (बीडीडीएस) वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.एम. खुल्लम, सहायक पोलीस निरीक्षक व्ही.आर. तांबोळी, हवालदार (डॉग हॅण्डलर) सचिन पाटील यांनी श्वान ‘टायगर’च्या मदतीने या बॅगेची तपासणी केली. मात्र, या बॅगेत तसे काहीच नसल्याचा निर्वाळा टायगरने अवघ्या काही मिनिटांतच दिला. त्यानंतर, ‘बीडीडीएस’च्या पथकाने ही बॅग नौपाडा पोलिसांच्या हवाली केली. बॅगेत केवळ कपडे आणि काही वैद्यकीय कागदपत्रे मिळाली. त्या कागदपत्रांच्या आधारे ती ठाण्याच्या महात्मा फुलेनगर येथे राहणाऱ्या सी.एच. प्रसादराव यांची असल्याचे उघड झाले. त्याचआधारे त्यांना पोलिसांनी संपर्कही केला. आंध्र प्रदेशात आपल्या गावी गेलेले प्रसादराव बुधवारी सकाळी ठाण्यात परतले. त्यांच्याकडे सहा बॅगा होत्या. ठाण्याच्या सॅटीस पुलावरून उतरल्यानंतर धावपळीत त्यांची एक बॅग मात्र रिक्षास्टॅण्डजवळच विसरली. थेट घरी पोहोचल्यानंतर त्यांना बॅग विसरल्याचे लक्षात आले. तोपर्यंत नौपाडा पोलिसांचाही त्यांना फोन आला. बॅगेत कोणताही बॉम्ब नसल्याचा निर्वाळा झाल्यानंतर पोलिसांसह नागरिकांनी तर बॅग मिळाल्यानंतर प्रसादराव यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.