श्रेयासाठी धावलात, पण मोराची गाडी कधी धावणार? बच्चे कंपनीचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 06:35 AM2018-01-31T06:35:16+5:302018-01-31T06:35:31+5:30
शहरातील बच्चे कंपनीसाठी प्रमुख आकर्षण असलेली मोराची गाडी पावसाळ््यापूर्वी नव्या स्वरूपात सुरू झाली खरी, पण सात ते आठ महिन्यांपासून ती बंदच आहे. नव्या गाडीचा शुभारंभ करताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपाच्या पदाधिका-यांनी उपस्थिती लावली होती.
डोंबिवली : शहरातील बच्चे कंपनीसाठी प्रमुख आकर्षण असलेली मोराची गाडी पावसाळ््यापूर्वी नव्या स्वरूपात सुरू झाली खरी, पण सात ते आठ महिन्यांपासून ती बंदच आहे. नव्या गाडीचा शुभारंभ करताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपाच्या पदाधिकाºयांनी उपस्थिती लावली होती. पण सध्याचे ‘वास्तव पाहता श्रेयासाठी धावलात, पण मोराची गाडी कधी धावणार?,’ असा सवाल उपस्थित होत आहे. मनसेचे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत यांनी तर बुलेट ट्रेनचे स्वप्ननंतर दाखवा, पण साधी मोराची गाडी तरी आधी सुरू करा, असा टोला सत्ताधारी शिवसेना-भाजपाला लगावला आहे.
पूर्वेतील नेहरू रोडवरील छत्रपती शिवजी महाराज उद्यानात १९९० च्या दशकात मोराची गाडी सुरू करण्यात आली. केडीएमसीचे हे उद्यान या भागातील आबालवृद्धांना फेरफटका मारण्यासाठी तसेच तरु णाई व लहान मुलांच्या विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण मानले जाते. या उद्यानातील मोराच्या गाडीची रपेट मारण्यासाठी लहानग्यांच्या अक्षरश: रांगा लागायच्या. परंतु, गेल्या काही वर्षांत पुरेशी देखभाल आणि दुरु स्ती होत नसल्याने ही गाडी बंद करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी दुरु स्ती अभावी ही गाडी रडतखडतच सुरू होती, अखेर कालांतराने ती बंद करण्यात आली. ही गाडी बंद असल्याच्या निषेधार्थ मनसेने महापालिकेच्या अधिकाºयांना मोरपीस भेट दिले होते. त्यानंतर ही गाडी दुरुस्त करून नव्या रूपात आणण्यात आली. या गाडीला इंजिनाच टचही देण्यात आला. याच्या शुभारंभप्रसंगी चव्हाण, नगरसेवक संदीप पुराणिक यांच्यासह अन्य भाजपाच्या पदाधिकाºयांनी उपस्थिती लावली होती.
दरम्यान, पावसाळ्यात बंद असलेली गाडी दिवाळी नंतर सुरू होईल अशी माहिती देण्यात आली. पण आजही गाडी धूळ खात उभी आहे. सर्वच राजकीय पक्षांचे त्याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. दिवाळीनंतर ही गाडी सुरू करण्याचे आदेश महापौर राजेंद्र देवळेकर यांनी अधिकाºयांना दिले होते. परंतु, ते देखील ठोस कृती अभावी कागदोपत्रीच राहिले आहेत.
लवकरच धावणार गाडी
केडीएमसी परिसरातील उद्याने देखभाल दुरुस्तीसाठी विविध संस्थानांना देण्याचा ठराव मंजूर केला गेला आहे. संबंधित उद्यान गणेश मंदिर संस्थानाकडे देण्यात आले आहे.
मोराची गाडी सुरू करण्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने येत्या महिनाभरात ही गाडी लहान मुलांसाठी उपलब्ध होईल, असा दावा भाजपाचे नगरसेवक संदीप पुराणिक यांनी केला आहे.
कुचकामी प्रशासन
आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आहे. पण निर्लज्ज सत्ताधारी आणि कुचकामी प्रशासन यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. नव्या स्वरूपातील मोराची गाडी सुरू होताना भाजपाचे राज्यमंत्री, नगरसेवक श्रेयासाठी धावले, उद्घाटनाचे फलकही झळकविण्यात आले. पण कित्येक महिने ही गाडी बंद आहे. साधी एक मोराची गाडी चालवू शकत नाही आणि बुलेट ट्रेन चालविण्याच्या वार्ता केल्या जातात, असा टोला मनसेचे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सत्ताधाºयांना लगावला.