ठाण्यात धावत्या कारला आग, कारमधील तिघे बचावले; कार इंजिनचे जळून नुकसान
By अजित मांडके | Published: April 6, 2024 04:14 PM2024-04-06T16:14:31+5:302024-04-06T16:15:28+5:30
कार ही साकेत येथे येताच कारच्या इंजिनमधून धूर येण्यास सुरुवात झाली. ही बाब लक्षात येताच बस्तिकर यांनी कार रस्त्याच्या बाजूला घेतली.
ठाणे : ठाण्यातून डोंबिवलीला निघालेल्या फॉर्ड फिगो कारला साकेत येथे आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी पावणे तीन ते तीन वाजण्याच्या दरम्यान समोर आली. यावेळी कारमध्ये तिघे जण प्रवास करत होते.आग लागल्याचे समजताच तिघे कारमधून बाहेर पडल्याने बचावले. या घटनेत कारच्या इंजिनचे जळून नुकसान झाले आहे. अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
गुरुप्रकाश बस्तिकर हे फॉर्ड फिगो कार घेऊन ठाणे पांचपाखाडी येथून डोंबिवलीला निघाले होते. कार ही साकेत येथे येताच कारच्या इंजिनमधून धूर येण्यास सुरुवात झाली. ही बाब लक्षात येताच बस्तिकर यांनी कार रस्त्याच्या बाजूला घेतली. तसेच कारमधून त्यांच्यासह तिघे बाहेर पडले. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवळपास अर्धा तास लागला. सुदैवाने याघटनेत कोणालाही दुखापत झाली नसून गाडीच्या इंजिनचे नुकसान झाले आहे. यावेळी ०१-रेस्क्यू वाहन पाचारण केले होते अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.