उद्धव ठाकरे यांच्या सभेची चालली पॉवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 01:34 AM2019-05-24T01:34:28+5:302019-05-24T01:35:23+5:30
ठाणे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांची चुरस निर्माण केल्याने ही निवडणूक अटीतटीची होईल, असे वाटत होते.
ठाणे - ठाणे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांची चुरस निर्माण केल्याने ही निवडणूक अटीतटीची होईल, असे वाटत होते. परंतु, अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीचा निकाल लागून राजन विचारे हे पुन्हा एकदा निवडून आले आहेत. या निवडणुकीत रंगत वाढवण्यासाठी शिवसेनेकडून केवळ एकमेव उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. तर, राष्टÑवादीने मतदानाच्या शेवटच्या दिवसांच्या सत्रात शरद पवार आणि जयंत पाटील यांची सभा घेतली होती. परंतु, उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी झाली, तर शरद पवार आणि पाटील यांच्या सभांचा मात्र काहीच परिणाम ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांवर झाला नसल्याचे दिसून आले.
ठाणे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राष्टÑवादीतर्फे आनंद परांजपे यांना अनपेक्षितपणे या निवडणुकीत उतरवण्यात आले. तर, शिवसेनेने राजन विचारे यांच्यावर विश्वास टाकला. त्यानंतर प्रचार काळात २१ एप्रिल रोजी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाण्यात सभा झाली. तिला पोहोचण्यास ठाकरे यांना उशीर झाला होता. तसेच या सभेला म्हणावी तितकी गर्दीसुद्धा झाली नव्हती. त्यामुळे त्याचा कितपत परिणाम होईल, याबाबत मात्र चिंता व्यक्त केली जात होती.
परंतु, या सभेत शरद पवार यांनी मोदींवर टीका करतानाच, राज्य सरकारवरही आसूड ओढले होते. शिवाय, पुलवामा हल्ला आणि इतर मुद्यांनासुद्धा त्यांनी हात लावला होता. परंतु, त्यांच्या सभेचा काहीच परिणाम न झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. शिवाय, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सुप्रिया सुळे यासुद्धा ठाण्यात तळ ठोकून होत्या. परंतु, त्यांचासुद्धा प्रभाव पडला नसल्याचे निकालात दिसून आले.
ठाकरेंची सभा
उद्धव ठाकरे यांनी केवळ १० मिनिटांचेच भाषण केले. या भाषणात त्यांनी युतीवर भाष्य करताना, काँग्रेस, राष्टÑवादीवर भरपूर टीका केली होती. तसेच युतीच्या काळात जी काही विकासकामे केली, त्यांची माहिती भाषणातून दिली होती.
पवारांची सभा
शरद पवार यांची सभा चांगलीच गाजेल आणि त्याचा मतदानावर आणखी चांगला परिणाम होईल, अशी शक्यता वाटत होती. त्यानुसार, प्रचार संपण्याच्या दोन दिवस आधी शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ठाण्यात सभा झाली.
राज ठाकरेंची सभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घ्यावी याकरिता मनसैनिकांनी प्रयत्न केले. ते असफल ठरले. मात्र प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राज ठाण्यात आले व त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पत्रकारांना ते सामोरे गेले नाहीत.