ग्रामीण भागात लसीकरणाला रजिस्ट्रेशनच्या अटीमुळे खाे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:35 AM2021-05-03T04:35:07+5:302021-05-03T04:35:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्यभरातील गावखेड्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी लाभार्थींची आधीच उदासीनता दिसून आली आहे. ग्रामस्थांसह आदिवासींमध्ये लसीकरणाविरोधात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्यभरातील गावखेड्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी लाभार्थींची आधीच उदासीनता दिसून आली आहे. ग्रामस्थांसह आदिवासींमध्ये लसीकरणाविरोधात गैरसमज झाल्याने ज्येष्ठ अजून पुढे आले नाहीत. पण, लाभार्थी तरुण पुढे येऊ घातला असतानाच रजिस्ट्रेशनची अट घातल्याने त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचे चित्र ठाणे, पालघरसह राज्यभरातील गावखेड्यांत दिसत आहे.
ग्रामीण भागातील लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी गावखेड्यांतील युवक लसीकरणासाठी पुढे आला आहे. ग्रामीण भागात फोनचा वापर फारसा हाेत नाही. त्यामुळे लसीकरणासाठी रजिस्ट्रेशनची अट ही डोकेदुखी ठरली आहे. ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात राज्य शासन व जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त हाेत आहे, असे वास्तव एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.
१ मेचा मुहूर्त जात असल्याच्या टीकेमुळे राज्य सरकारने तरुणांचे लसीकरण हाती घेतले. मात्र, लसींच्या तुटवड्यामुळे शहरांसह ग्रामीण भागाला रजिस्ट्रेशनची अट घालून केंद्रांवरील गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामीण भागात लाभार्थींच्या प्रतीक्षेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांतील लसीकरण केंद्रे ओस पडलेली आहेत. लसीकरणासाठी नागरिकांनी पुढे यावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासन गावपाड्यांमध्ये त्यांच्या भाषेत जनजागृती करत आहे. लसीकरण वाढवण्यासाठी पथकांमधील अधिकाऱ्यांच्या गाड्या गावपाड्यांच्या रस्त्यांनी धावत आहेत.
लसीचा साठा सांभाळण्याची समस्या
लसीकरण हाेत नसल्यामुळे ग्रामीण भागात उन्हाळ्यात आरोग्य केंद्रांवरील लसीचा साठा सांभाळण्याची गंभीर समस्या उभी राहिली आहे. ग्रामीण तरुणांच्या लसीकरणासाठी रजिस्ट्रेशनच्या घातलेल्या अटीमुळे आरोग्य केंद्रांवरील डाॅक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांवर तरुण राग काढत आहेत. याकडे राज्य शासनाने लक्ष देऊन लसीकरणासाठी रजिस्ट्रेशनची अट शिथिल करण्याची मागणी करण्यात येत आहे.