ग्रामविकासाची मुहूर्तमेढ
By admin | Published: October 5, 2016 02:12 AM2016-10-05T02:12:34+5:302016-10-05T02:12:34+5:30
स्वच्छता, शिक्षण, कला, पर्यावरण आणि पर्यटन या पंचसूत्री कार्यक्र माची नियोजनबद्ध अंमलबजावणी गांधीजयंती दिनी करून चिखले ग्रामस्थांनी ग्रामविकासाची मुहुर्तमेढ रोवली
डहाणू / बोर्डी : स्वच्छता, शिक्षण, कला, पर्यावरण आणि पर्यटन या पंचसूत्री कार्यक्र माची नियोजनबद्ध अंमलबजावणी गांधीजयंती दिनी करून चिखले ग्रामस्थांनी ग्रामविकासाची मुहुर्तमेढ रोवली. महात्मा गांधींचे वालुशिल्प आणि रेतीवर रांगोळीने रेखाटलेल्या चित्राने पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विद्यार्थी, महिला, युवक आणि जेष्ठांनी स्वच्छता मोहीम राबवून कृतीशील कार्य केले.
दुपारी अडीच वाजता चिखले हनुमान मंदिर येथून आजी-माजी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिलांनी एकत्रित येवून मुख्यरस्ता व परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर रिठी समुद्रकिनारी मोठा जनसमुदाय एकवटला होता. तेथे बापूंच्या वाळूशिल्पाला अभिवादन करून चिखले ते वडकती या दीड किमी लांबीच्या समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. या करिता तटरक्षक दलाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगदान दिले. डहाणू पंचायत समितीचे उपसभापती लतेश राऊत व ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून अल्पोपहार दिला. केंद्रशाळा चिखले, विजयवाडी, खाडीपाडा येथे स्वच्छता केली.
केंद्र सरकारचे स्वच्छ भारत अभियान, तटरक्षक दलाची किनारा स्वच्छता मोहीम, मेरीटाइम बोर्डचे निर्मल सागरतट अभियान या धर्तीवर गांधीजयंती दिनी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या सर्व स्वच्छता मोहीम राबविल्याचा लौकिक चिखले गावाने जिल्ह्यात प्राप्त केला आहे. गांधीजयंतीच्या दिवशी चिखले गावात बारा तास स्वच्छता मोहीम राबविली गेली. पंकज पाटील, रतीलाल डोंगरे, किरण पाटील, मनीष जोंधळेकर यांनी कार्यक्रमाची यशस्वी आखणी केली होती. (वार्ताहर)