अंबाडीतील ग्रामीण रुग्णालय जागेअभावी रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:09+5:302021-06-18T04:28:09+5:30
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरण केले ...
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरण केले जात आहे. असे असताना दुसरीकडे भिवंडी तालुक्यातील अंबाडी ग्रामीण रुग्णालय जागेअभावी रखडले असल्याची बाब भाजप सदस्य कैलास जाधव यांनी उघड केली, तर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ नाही, शस्त्रक्रिया विभागही बंद असल्याची गंभीर बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
ठाणे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष पुष्पा बोऱ्हाडे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य जाधव यांनी अंबाडी येथील ३० बेड्सचे ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे. त्यासाठी आवश्यक असलेला डॉक्टर, इतर कर्मचारी वर्गही उपलब्ध आहेत. अंबाडीपासून ते वाड्यापर्यंत कोविड सेंटर उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांना थेट पाली अथवा सावद येथे जावे लागते. त्या अनुषंगाने अंबाडी येथे कोविड सेंटरही उभारणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. २० ते २५ एकर जागा उपलब्ध असून, ती वन विभागाकडे आहे. केवळ त्या जागेच्या सातबाऱ्यावर महसूल विभागाचे नाव असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. शहापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. येथे बालरोग, स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नाही, शस्त्रक्रिया विभाग दोन वर्षांपासून बंद आहे. प्रसूती दरम्यान अडचण निर्माण झाल्यास उल्हासनगर अथवा मुंबईला पाठविले जाते, असे जाधव यांनी नमूद केले. सिटी स्कॅन मशीन बंद असल्याची बाब सदस्य राजेंद्र विशे यांनी निदर्शनास आणून दिली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले की, अंबाडी हे अनुशेषमध्ये ग्रामीण रुग्णालय म्हणून मंजूर आहे. तसेच जागेसाठी आवाहन करूनही जागा उपलब्ध होऊ शकली नाही. तसेच वन विभागाची एक एकर जागा मिळते, त्या जागेवर रुग्णालय उभारावे यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास रुग्णालयाच्या कामाला सुरुवात करता येईल असे त्यांनी सांगितले. त्या ठिकाणी मंजूर झालेले एक अधीक्षक आणि दोन डॉक्टर हे भाड्याने घेतलेल्या जागेत रुग्णालय चालवीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-----------------------------------------------
शहापूरमध्ये १० ते १५ डॉक्टरांची केली नेमणूक
शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी एक बालरोग तज्ज्ञ आणि एक स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली आहे. येथील शस्त्रक्रिया विभाग मध्यंतरी काही कारणामुळे बंद होता. मात्र, आता त्या ठिकाणी तीन शस्त्रक्रिया विभाग सुरू असल्याचे ते म्हणाले. शहापूरला तीन वर्षांत १० ते १५ डॉक्टर नेमण्यात आल्याचेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.