मुरबाड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय पडले ओस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 12:40 AM2021-01-31T00:40:55+5:302021-01-31T00:41:22+5:30
hospital news : थंडी तापाने फणफणलेल्या मुरबाड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी करणारे मशीन बंद असल्यामुळे किरकोळ उपचारांसाठी नागरिकांना खासगी हाॅस्पिटलमधून महागडे उपचार घ्यावे लागत आहेत.
- प्रकाश जाधव
मुरबाड - थंडी तापाने फणफणलेल्या मुरबाड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी करणारे मशीन बंद असल्यामुळे किरकोळ उपचारांसाठी नागरिकांना खासगी हाॅस्पिटलमधून महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. यामुळे खासगी रुग्णालय हाऊसफुल्ल तर तालुक्याचे ग्रामीण रुग्णालय मात्र ओस पडलेले आहे.
मुरबाड तालुक्यात थंडी, तापाने थैमान घातले आहे. शिवाय कोरोनाचे रुग्णही आढळत आहेत. असे असताना तालुक्यातील सुमारे सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून पुढील उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना तसेच गर्भवतींना तालुक्याच्या ठिकाणी आणल्यास ग्रामीण रुग्णालयात असलेली डॉक्टरांची कमतरता, बंद असलेला शस्त्रक्रिया विभाग आणि आता प्राथमिक आजाराचे निदान करणारे रक्त तपासणी मशीन गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहे.
रोज चारशे ते साडेचारशे ओपीडीत येणाऱ्या रुग्णांची संख्या आता १००च्या घरात आहे. केवळ चार गोळ्या देऊन उपचार होत आहेत. या परिस्थितीमुळे रुग्णालयातील खाटा रिक्त दिसत आहेत. त्यामुळे महिलांची प्रसूती तसेच थंडी, तापाचे व किरकोळ अपघाताच्या रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागत आहे.
ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने व रक्त तपासणीचे मशीन नादुरुस्त असल्यामुळे रुग्णांना उपचार देण्यासाठी अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे नवीन डॉक्टरची भरती करणे ही आरोग्य विभागाची जबाबदारी आहे.
- डॉ. संजय वाठोरे,
वैद्यकीय अधीक्षक,
ग्रामीण रुग्णालय मुरबाड