ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग झोळीमुक्त होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:48+5:302021-07-15T04:27:48+5:30
ठाणे : जन्मलेल्या नवजात बाळाला कपड्यात घट्ट गुंडाळून झोळीत झोपविल्याने बाळ चांगले बाळसे धरते, असे बोलले जाते. मात्र, दुसरीकडे ...
ठाणे : जन्मलेल्या नवजात बाळाला कपड्यात घट्ट गुंडाळून झोळीत झोपविल्याने बाळ चांगले बाळसे धरते, असे बोलले जाते. मात्र, दुसरीकडे याच झोळीमुळे बालकांना आरोग्यविषयक समस्या भेडसावू लागल्या असून कुपोषणाच्या संख्येतदेखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामीण भाग झोळीमुक्त करण्याच्या दृष्टीने अनोखा उपक्रम राबविण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भाग हा आदिवासीबहुल आहे. या भागातील नागरिक आजही जुन्या अनिष्ट रूढी, परंपरा यांच्या विळख्यात अडकलेले आहे. त्यात, या भागातील नागरिकांचे रोजगारासाठी आजही स्थलांतर सुरू आहे. त्यातून अनेकदा नवजात बालकांसह लहानग्यांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. तसेच बालसंगोपनाच्या पारंपरिक पद्धतीमुळे बालकांच्या सुरुवातीच्या कालावधीतच त्यांच्या वाढ होण्यावर मर्यादा येतात. त्यातून यामुळे कुपोषणासारखी समस्या प्रामुख्याने भेडसावत आहे. तसेच बालकांचा आहार, स्वच्छता आणि सुरुवातीच्या काळातील सुरक्षितता याविषयी पालकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभाग नेहमीच कार्यरत असतात.
झोळीमुळे बाळाला श्वास घेण्यास त्रास
ग्रामीण भागात आजही जन्मलेल्या बालकांना झोपवण्यासाठी घरात साडीपासून झोळी तयार केली जाते. परंतु, तिची रचना पाहिल्यास यात पुरेशी खेळती हवा उपलब्ध होत नसल्यामुळे बालकांना श्वास घेण्यास त्रास होतो, बालकांच्या हालचालींवर मर्यादा येतात. त्याचबरोबर, बालकाला जास्त वेळ झोळीत ठेवल्यावर त्याची वाढ खुंटते अशा विविध आरोग्यविषयक समस्या बालकांमध्ये दिसून येतात. यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कुपोषित बालकांची संख्या आढळून येते.
बाहेर ठेवल्यास प्राणिदंशाची भीती
बाळाला झोळीतून काढून जमिनीवर ठेवल्यामुळे अज्ञात प्राणिदंश किंवा सर्पदंशामुळे त्याचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. कुपोषित बालकांचे आणि बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी ग्रामीण भागात बालकांच्या विकासासाठी विशेष सुविधा तसेच पालकांना बालसंगोपनाविषयी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. बालकांच्या वाढीसाठी तसेच त्यांचा विकास योग्यप्रकारे होण्यासह सर्पदंश किंवा अज्ञात प्राणिदंशामुळे होणाऱ्या बालमृत्यूंवर आळा बसावा, यासाठी ज्या घरात लहान बाळ असेल, त्याच्या कुटुंबांना पाळणा, कांगारू मदर केअर आणि इतर गरजेच्या वस्तू या झोळीमुक्ती मोहिमेंतर्गत देण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग झोळीमुक्त होण्यास मदत होणार आहे.
.......
बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, बालसंगोपनातील चुकीच्या पद्धतींना आळा घालणे या उद्देशाने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात येत असून निश्चितपणे कुपोषणमुक्ती व बालमृत्यू प्रतिबंध या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उपक्रमाचा निश्चित फायदा होईल.
संतोष भोसले, महिला व बालविकास अधिकारी, जि.प. ठाणे