ग्रामीण रुग्णांना मिळणार अद्ययावत आरोग्य सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 11:39 PM2021-02-27T23:39:03+5:302021-02-27T23:39:11+5:30
एडवण आरोग्य केंद्र सुसज्ज : २५-३० हजार नागरिकांना लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : सफाळे परिसरातील रुग्णांच्या उपचारासाठी चांगल्या सोयी-सुविधा असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आता एडवण येथे लोकार्पण करण्यात आल्याने परिसरातील २५ ते ३० हजार नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. सफाळे परिसरातील एडवण पंचक्रोशी परिसरात शासकीय आरोग्य सुविधांची वानवा असल्याने चांगली आरोग्य सेवा असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र मिळावे, अशी मागणी होती.
या गटातून निवडून आलेले तत्कालीन जिल्हा परिषदेचे सभापती दामोदर पाटील यांनी एडवण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येत गुरुवारी हे आरोग्य केंद्र नागरिकांसाठी खुले करण्यात आले. सुमारे चार कोटी ८० लाख रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्रासह कर्मचारी वसाहत निर्माण करण्यात आली आहे. कोकणातील हे दुसऱ्या क्रमांकाचे प्राथमिक आरोग्य केंद्र असणार आहे. येथे लहान शस्त्रक्रिया केल्या जाणार असून प्रसूतिगृहही अद्ययावत केले आहे. दोन-तीन आरोग्य अधिकाऱ्यांसह परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी आदी कर्मचारी उपलब्ध राहणार आहे.
या केंद्राची रुग्णवाहिका निर्लेखित केली असली तरी आरोग्य विभागामार्फत भाडेतत्त्वावर वाहन ठेवून येथे रुग्णवाहिकेची सोय करून दिलेली आहे. हे केंद्र १० खाटांचे असून बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग सुरू राहणार आहे. परिसरातील १० उपकेंद्रांना जोडले गेलेले हे प्राथमिक आरोग्य केंद्र असणार आहे. खाजगी आरोग्यसेवेपेक्षाही चांगली सेवा या प्राथमिक केंद्रातून यापुढे नागरिकांना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी सांगितले. या वेळी पालघर जि.पच्या आरोग्य समितीची बैठक या केंद्रात पार पडली. त्या वेळेला छोटेखानी कार्यक्रमात हे आरोग्य केंद्र सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.
जनतेच्या आरोग्य सुविधांसाठी अशी सुसज्ज आरोग्य केंद्रे भविष्यात उभारण्यात येत असल्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी येऊन नागरिकांना त्यामार्फत चांगली सेवा पुरवू शकू. याचा आनंद आहे.
- नीलेश सांबरे,
उपाध्यक्ष तथा सभापती आरोग्य,
जि. प. पालघर