राजशिष्टाचार खुंटीला; महापौरांचे लोटांगण
By admin | Published: December 24, 2015 01:43 AM2015-12-24T01:43:18+5:302015-12-24T01:43:18+5:30
ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी जाहीर केलेले एकही काम मार्गी लागत नसल्याने सध्या राजशिष्टाचार खुंटीला गुंडाळÞून महापौर हे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दालनात खेटे घालत आहेत.
अजित मांडके, ठाणे
ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी जाहीर केलेले एकही काम मार्गी लागत नसल्याने सध्या राजशिष्टाचार खुंटीला गुंडाळÞून महापौर हे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दालनात खेटे घालत आहेत. आयुक्त महापौरांना चहा पाजून परत पाठवतात आणि त्यांच्या कामाच्या निवेदनाला केराची टोपली दाखवतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे आता शिवसेना स्टाइलने इंगा दाखवण्याच्या राणाभीमदेवी थाटाच्या घोषणा महापौरांनी केल्या आहेत.
आधीच ठाणे महापालिकेचे अंदाजपत्रक मंजूर व्हायला आॅक्टोबर उजाडल्याने अंदाजपत्रकातील कामे होत नसल्याची तक्रार आहे. महापौर मोरे यांनी काही प्रकल्पांची व महत्त्वाच्या कामांची घोषणा केली होती. त्यातील एकही योजना सुरू न झाल्याने महापौर कमालीचे अस्वस्थ आहेत. महापौर हे या शहराचे प्रथम नागरिक असल्याने त्यांच्या भेटीला आयुक्तांनी जावे, असा राजशिष्टाचार आहे. परंतु, महापौरांची गंगा उलटी वाहत आहे. आपली कामे मंजूर करवून घेण्याकरिता ते आयुक्त जयस्वाल यांच्या दालनात खेटे घालत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते व त्यांना आपला शिवसैनिक असलेला महापौर नोकरशाहीचे असे लांगुलचालन करीत असल्याचे कळले असते तर त्यांनी कठोर शब्दांत महापौरांची कानउघाडणी केली असती, असे मातोश्रीच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
गेल्या काही स्थायी समिती, महासभांमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी नगरसेवक निधीच्या मुद्यावरून प्रशासनाला धारेवर धरले होते. काही ठरावीक नगरसेवकांच्या वॉर्डांत कामे केली जात असून इतर नगरसेवकांना मात्र आजही या निधीपासून वंचित राहावे लागत असल्याची काही नगरसेवकांची तक्रार आहे. अशा नाराज नगरसेवकांनी महापौरांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला असता महापौर मोरे यांनी आपली हतबलता त्यांच्या कानांवर घातली.
मोरे यांनी ठाणेकरांच्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रस्ताव पुढे आणले आहेत. विशेष म्हणजे यातील एकही प्रस्ताव अद्याप मार्गी तर लागला नाहीच, शिवाय नगरसेवक निधीच्या मुद्यावरूनही महापौरांचे प्रशासनाबरोबर खटके उडत आहेत.
रखडलेल्या प्रस्तावांची यादी महापौरांनी तयार केली आहे. ही यादी घेऊन मोरे आयुक्त जयस्वाल यांना भेटले. मात्र, त्यातून काहीच हाती लागत नाही. त्यामुळे आयुक्तांनी आपल्या कामाला केराची टोपली दाखवल्याची भावना महापौरांनी बोलून दाखवली.