कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी सचिन बोरसे
By जितेंद्र कालेकर | Published: December 28, 2023 07:44 PM2023-12-28T19:44:13+5:302023-12-28T19:44:25+5:30
ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती.
ठाणे:ठाणे महानगरपालिकेच्या कळवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी सचिन बोरसे यांची नियुक्ती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गुरुवारी केली. अलिकडेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई न केल्याच्या तक्रारीवरुन सुबोध ठाणेकर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. त्यामुळे त्यांच्या जागी बोरसे यांना अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. प्रसंगी संबंधितांवर गुन्हेही दाखल केले जातील. मात्र, अनधिकृत बांधकामे खपवून घेतली जाणार नाहीत, अशी ग्वाही अधिवेशनात दिली होती.
याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनीही अनधिकृत बांधकामांवर कारवाई न केल्यास संबंधितांवर गंभीर स्वरुपाची कारवाई करण्यात येईल. तसेच सहाय्यक आयुक्तांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशाराही प्रशासनाला दिला होता. त्यापाठोपाठ पालिका प्रशासनाने सुबोध ठाणेकर यांना ४५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले. सध्या महापालिकेच्या मुख्यालयात परवाना तसेच निवडणूक विभागात सहायक आयुक्त असलेल्या बोरसे यांना त्यांचा सध्याचा पदभार सांभाळून कळवा विभागाचीही अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.