रेतीबंदर प्रभाग बकाल
By admin | Published: June 29, 2015 04:41 AM2015-06-29T04:41:27+5:302015-06-29T04:41:27+5:30
कल्याण-डोंबिवली मनपाच्या प्रभाग क्षेत्रांतर्गत वॉर्ड क्र. २० रेतीबंदर या वार्डातही अंतर्गत रस्ते, पायवाटा आणि दैनंदिन समस्या पहावयास मिळतात.
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाच्या प्रभाग क्षेत्रांतर्गत वॉर्ड क्र. २० रेतीबंदर या वार्डातही अंतर्गत रस्ते, पायवाटा आणि दैनंदिन समस्या पहावयास मिळतात. अनियोजितपणा या वार्डामध्ये आहे. कित्येक वर्षांपासून या वॉर्डातून गेलेल्या गोविंदवाडी पत्रीपूल रस्त्याचे घोंगडे भिजत पडले आहे. याच परिसरात तबेले भरपूर आहे. परिणामी त्यांच्या घाणीची समस्या, तुंबलेली गटारे यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोणत्याही मनपाच्या कर्मचाऱ्यास या परिसरात साफसफाई करण्याची गरज भासत नसल्यासारखे येथे चित्र आहे. पिण्याचे पाणीही कमी दाबाने येत असल्याचे येथील रहिवासी सांगतात. या वॉर्डात गोविंद वाडीचा काही भाग, घास बाजारचा काही भाग, रेतीबंदरचा काही भाग, अमृत पामस सोसायटी, काळसेकर इंग्लिश स्कूल, आमान अपार्टमेंट, हजरत इमाम हुसेन चौक, गोविंदवाडी पत्रीपूल रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेला भाग येतो.
कल्याणच्या मध्य भागातून जाणाऱ्या वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी गोविंदवाडी-पत्रीपूल या बायपास रस्त्याची आखणी केली होती. परंतू अतिशय संथगतीने हे काम सुरु आहे. परिणामी कल्याणमधील वाहतूकीचा रोज प्रचंड खोळंबा होत आहे. वाहतूक नियंत्रणात आणताना ट्रॅफीक पोलिसांची दमछाक होत आहे. या वॉर्डात रेतीबंदर असल्यामुळे कल्याण खाडी किनारी असलेल्या रेतीबंदर वर असंख्य जड वाहने रेतीची वाहतूक करीत असतात. त्यामुळे येथील रहिवाशांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रेतीबंदरवरून सध्या सुरु असलेल्या रस्त्याची चाळण झाली आहे. या वॉर्डात मुलांसाठी खेळण्यासाठी मैदान नाही. उद्यानही नाही. दैनंदिन साफसफाई विषयी बोलताना येथील नगरसेवक अयुब कुरेशी हे ही याबाबत आपण असफल झाल्याचे मान्य करतात. पण त्याला पालिकाच जबाबदार असल्याचे ते सांगतात. पालिकेकडे सफाईसाठी कर्मचारीच नसल्याचे सांगतात. वारंवार पालिकेकडून आश्वासन मिळते पण पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. आणि वर्षामागून वर्षे अशीच निघून जातात असे कुरेशी सांगतात. (प्रतिनिधी)