साड्या, पडद्यांपासून बनवल्या पिशव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:37 AM2018-05-16T03:37:37+5:302018-05-16T03:37:37+5:30
‘इनरव्हिल क्लब’तर्फे शून्य कचरा मोहिमेअंतर्गत जमा केलेल्या वापरण्याजोग्या साड्या, चादर व पडदे यापासून कापडी पिशवी तयार केल्या जाणार आहेत.
जान्हवी मोर्ये
डोंबिवली : ‘इनरव्हिल क्लब’तर्फे शून्य कचरा मोहिमेअंतर्गत जमा केलेल्या वापरण्याजोग्या साड्या, चादर व पडदे यापासून कापडी पिशवी तयार केल्या जाणार आहेत. या पिशव्या दुकानदारांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांना सक्षम पर्याय मिळणार आहे.
ऊर्जा फाउंडेशन, समतोल इको वर्क्स डोंबिवली, इनरव्हिल क्लब आणि मिलापनगर असोसिएशन यांच्यातर्फे शहरात घरातील जाड प्लास्टिक, पातळ प्लास्टिक, ई-कचरा, जुन्या चपला, बूट, वापरण्यायोग्य जुने पण चांगले कपडे, बॅग व पर्स, थर्माकोल या वस्तू गोळा केल्या जातात. जुन्या कपड्यांपासून पिशव्या तयार करण्याचे काम इनरव्हिल क्लबने हाती घेतले आहे. हे काम बचत गटांना दिले आहे. बचत गटांकडून आठ रुपयाला एक पिशवी शिवून घेतली जाते. त्यावर लोगो लावण्यासाठी दोन रुपये खर्च येतो. संस्थेला ही पिशवी एकूण १० रुपयांना पडते. संस्था या पिशव्या दुकानदारांना देणार आहे.
‘इनरव्हिल’तर्फे दुकानदारांना भेटून या पिशव्या घेण्याचे आवाहन करणार आहेत. दुकानदार त्याला १० रुपयांना मिळणारी एक नग पिशवी ग्राहकांना १२ रुपयाला देणार आहे. ग्राहकांनी दुसऱ्या दिवशी ती पिशवी दुकानदाराला परत केल्यास त्याला १० रुपये परत केले जाणार आहेत. ग्राहकांनी पिशवी दुकानदाराला न दिल्यास त्याला ती १२ रुपयांमध्ये वापरता येते. ग्राहकांनी दुकानदाराला दिल्यास त्याला २ रुपये नफा कमवता येणार आहे. तसेच कापडी पिशव्यांचा पुर्नवापर होईल. २५० पिशव्या तयार केल्या आहेत, अशी माहिती अपर्णा कवी यांनी दिली आहे.