उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही भिवंडीत कुर्बानी सेंटर जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:42 AM2019-08-09T00:42:09+5:302019-08-09T00:42:22+5:30
भिवंडी पालिका अडचणीत : रस्त्यावर कुर्बानीस न्यायालयाची मनाई
भिवंडी : मुस्लिम धर्मीयांची बकरी ईद १२ ते १४ आॅगस्टदरम्यान साजरी होणार आहे. या सणाला दरवर्षी सार्वजनिक ठिकाणी तात्पुरत्या कुर्बानी सेंटरची उभारणी भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येते. मात्र, यावर्षी मुंबई उच्च न्यायालयाने रस्त्यावर कुर्बानी करण्यास सक्त मनाई केली आहे. असे असताना मार्केट विभागाच्या उपायुक्ता वंदना गुळवे यांनी गुरुवारी शहरातील प्रभागनिहाय ३८ ठिकाणे कुर्बानी सेंटर जाहीर केले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याने भाजप, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ पदाधिकारी अॅड. मनोज रायचा, अशोक जैन आदींनी नाराजी व्यक्त करीत स्थानिक पोलीस ठाण्यासह उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
बकरी ईदनिमित्त पालिकेने यावर्षीही सुमारे ८५ लाखांहून जास्त खर्चाची तरतूद केली असून, हा खर्च मार्केट विभाग, वाहन विभाग, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग तसेच विद्युत विभागामार्फत करण्यात येणार आहे. तीन दिवस साजऱ्या होणाºया या सणासाठी सुमारे ४३० कर्मचारी, अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पालिकेचे आयुक्त अशोककुमार रणखांब, वंदना गुळवे आणि महापौर जावेद दळवी यांनी यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रमुख आणि प्रभाग अधिकारी, कर्मचाºयांची विशेष बैठकही घेतली. प्रभाग समिती क्रमांक १ ते ५ अंतर्गत असलेल्या बाला कम्पाउंड, खंडूपाडा, रहेमतपुरा, गैबीनगर, मिल्लतनगर, फंटोळेनगर, पिराणीपाडा, पटेलनगर, अजमेरनगर, शास्त्रीनगर, ईदगाह रोड, दर्गा रोड, आजमीनगर, समदनगर, म्हाडा कॉलनी अशा नागरी वस्त्या आणि सोसायट्या असलेल्या विविध ठिकाणी कुर्बानी सेंटर पालिका प्रशासनाच्या वतीने उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे पालिकेचे अधिकारी आणि पोलिसांनी या ठिकाणांची पाहणी केली आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने यापुढे रस्ते, पदपथ किंवा नागरी वस्त्यांमध्ये तात्पुरत्या कुर्बानी सेंटरला परवानगी देऊ नये, असे आदेश दोन दिवसांपूर्वीच दिले आहेत. तसेच दिलेले सर्व परवाने तत्काळ रद्द करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे भिवंडीतील विश्व हिंदू परिषद, गोवंश संवर्धन परिषद आणि बजरंग दलाचे काम पाहणारे पदाधिकारी अशोक जैन आणि अन्य पदाधिकाºयांनी पालिका आयुक्त अशोककुमार रणखांब आणि पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांना निवेदन देऊन भिवंडी शहरात दिलेल्या तात्पुरत्या ३८ कुर्बानी सेंटरच्या परवानग्या रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे भिवंडी महापालिका प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे भिवंडी महापालिका उल्लंघन करत असल्याने पालिका प्रशासनाविरोधात त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे. यासंदर्भात उपायुक्त वंदना गुळवे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही.
पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यासोबत झालेल्या शांतता कमिटी व मोहल्ला कमिटीच्या बैठकीत मनपा उपायुक्त दीपक कुरळेकर हे स्वत: हजर होते. त्यावेळी पाच प्रभागांमध्ये मनपाने जाहीर केलेले ३८ कुर्बानी सेंटर हे तात्पुरते असल्याने, या कुर्बानी सेंटरवर कुर्बानी होणार आहे.
- अशोकुमार रणखांब,
मनपा आयुक्त
भिवंडी मनपा प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला असून याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून मनपाने उभारलेल्या ३८ कुर्बानी सेंटरवर स्थगिती आणण्यासाठी याचिकाही दाखल करणार आहोत.
- अॅड. मनोज रायचा, पदाधिकारी, विश्व हिंदू परिषद