महाराष्ट्रातील मनाला चटका लावणारं वास्तव; रस्ता नसल्याने २९४ बालमृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 06:49 AM2022-12-05T06:49:05+5:302022-12-05T06:49:44+5:30
नवीन पुलांसाठी निधी राखीव, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत स्थळ प्रत्यक्ष पाहणी करून १६५ गावपाड्यांतील रस्त्यांची कामे निश्चित करण्यात आली आहेत.
रवींद्र साळवे
मोखाडा : जव्हार-मोखाड्यातील अनेक गावपाड्यांना जोडणारे रस्ते नसल्याने आदिवासी बांधवांना सोयी-सुविधांअभावी मरणयातना भोगाव्या लागत आहेत. आजही येथील आदिवासी गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी, दवाखान्यात आणण्यासाठी डोली करून ७ ते ८ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
वर्षभरात प्रसूतीच्या सेवा न मिळाल्याने २० मातांचा मृत्यू झाला आहे, तर २९४ बालमृत्यू झाले आहेत. यामुळे रस्ता व पुलाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, जव्हारसाठी २८ कोटी ७५ लाख तर मोखाड्यासाठी ३४ कोटी ५० लाख रुपयांची नवीन पुलांसाठी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात रस्ता व पुलांअभावी होणारी परवड थांबणार असल्याची चिन्हे आहेत.
मूलभूत सुविधांपासून आदिवासी पाडे वंचित
जव्हार तालुक्यातील हुंबरण, सुकळीपाडा, डोंगरीपाडा, उदारमाळ, केळीचापाडा, निंबारपाडा, तुंबडपाडा, दखण्याचापाडा, उंबरपाडा, मनमोहाडी, भाट्टीपाडा, सावरपाडा, सोनगीरपाडा, घाटाळपाडा, भुरीटेक आणि बेहेडपाडा तर मोखाडा तालुक्यातील कोल्हेधव, मुकुंदपाडा, बिवलपाडा, शेंडीपाडा, जांभूळपाडा, रायपाडा, किरकिरेवाडी, मरकटवाडी, आमले येथील आदिवासी खेड्यापाड्यांत रस्ता, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत.
१६५ गावपाड्यांतील रस्त्यांची कामे
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत स्थळ प्रत्यक्ष पाहणी करून १६५ गावपाड्यांतील रस्त्यांची कामे निश्चित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील गावपाडे, रस्ते व पुलांबाबत प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. १६५ वस्त्यांकरिता १४५ रस्त्यांची आवश्यकता असून त्यापैकी ३० रस्ते वर्गीकृत प्लान रोडमध्ये आहेत, तर उर्वरित ११५ रस्ते ‘अ’ वर्गीकरणात आहेत. जव्हार तालुक्यात ४५, वाडा ५, विक्रमगड ३१, मोखाड्यात १७, पालघरमध्ये १४ अशा सहा तालुक्यांतील ११५ रस्त्यांसाठी १५० कोटी ९५ लाख ५० हजारांचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.