सद्गुरू अर्थात अंतर्मनावर सोपवा आपला ताणतणाव; प्रल्हाद पै यांचे आनंद मेळाव्यात आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2022 05:46 AM2022-10-31T05:46:28+5:302022-10-31T05:46:39+5:30
प्रल्हाद पै यांचे आनंद मेळाव्यात आवाहन
कर्जत : तणाव हा खूप महत्त्वाचा आहे. त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे ताणतणाव तुम्ही सद्गुरू यांच्यावर म्हणजे अंतर्मनावर सोपवा, असे आवाहन जीवनविद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै यांनी रविवारी आनंद मेळाव्यात केले. जे आहे त्याच्याबद्दल आणि ज्यांच्यामुळे मिळाले आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगा. जो क्षण आहे त्याचा आनंद घ्या आणि सतत सद्गुरू यांचा किंवा परमेश्वराचे स्मरण करा, असे तीन महत्त्वपूर्ण मंत्र त्यांनी तणाव येऊ नये म्हणून यावेळी दिले.
श्री सद्गुरू वामनराव पै प्रणीत जीवनविद्या मिशनतर्फे ‘आनंद मेळावा’ आयोजित केला आहे. रविवारी दुसऱ्या दिवशी ज्यांचा सद्गुरू कार्यात खूप मोठा वाटा आहे, अशा जीवनविद्या मिशनच्या ज्येष्ठ नामधारकांना यावेळी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जीवनविद्या मिशनचे ज्येष्ठ नामधारक रमेश चिंदरकर ऊर्फ नारायण चिंदरकर यांचा जीवनविद्येचे जीवनगौरव पुरस्काराने, तर प्रभाकर नाईक आणि प्रभाकर देसाई यांचादेखील जीवनविद्या गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
जीवनविद्या मिशनतर्फे २०२२ -२३ हे वर्ष सद्गुरूंचे जनशताब्दी वर्षे म्हणून साजरे करण्यात येणार आहे. हे वर्ष ‘प्रत्येक कृती ही राष्ट्रहित आणि विश्वशांती’ या विचाराने साजरे केले जाणार आहे. या विचाराप्रमाणे जीवनविद्या मिशनचे असंख्य नामधारक वागत असतात. जीवनविद्या मिशनमधील पहिले नामधारक आयएस अधिकारी मकरंद खेतमाळी हे या कार्यक्रमात उपस्थित होते. हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून खेतमाळीस हे कार्यरत आहेत. ‘
जीवनविद्या मिशन’ ही संस्था मोठे कार्य करीत आहे. कामामुळे या कार्यात सहभागी होणे शक्य होत नाही पण या कार्याचा मुख्य हेतू ‘प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची’ याप्रमाणे वागण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे. क्षणोक्षणी सद्गुरूंचा आशीर्वाद आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाची महती मला आली’ असे खेतमाळी यांनी यावेळी सांगितले.