बेकायदा शेड तोडली म्हणून मीरा-भाईंदर महापालिकेवर साधूंचा मोर्चा
By धीरज परब | Published: October 4, 2022 07:21 PM2022-10-04T19:21:40+5:302022-10-04T19:22:07+5:30
यावेळी महापालिकेने केलेल्या कारवाई बद्दल संताप व्यक्त करत साधू मुख्याच्या प्रवेरशद्वारा बाहेर रस्त्यावर जमले होते.
मीरारोड - मीरा-भाईंदर महापालिकेने एका आश्रमाच्या बेकायदा वाढीव शेड वर तोडक कारवाई केल्याच्या निषेधार्थ साधूंनी पालिका मुख्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला.
काशीमीरा भागातील ग्रीन व्हिलेज, डाचकूल पाडा परिसरात चिदयानम आश्रम आहे. त्या आश्रमातील बेकायदेशीर पत्रा शेडवर महापालिकेने कारवाई केली होती. या कारवाईच्या निषेधार्थ आश्रमाचे प्रमुख स्वामी सितंबरम यांच्या नेतृत्वाखाली साधूंनी पालिका मुख्यालयावर मोर्चा आणला होता. मोर्चात विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते सुद्धा सहभागी झाले होते. यावेळी महापालिकेने केलेल्या कारवाई बद्दल संताप व्यक्त करत साधू मुख्याच्या प्रवेरशद्वारा बाहेर रस्त्यावर जमले होते.
पालिकेच्या वतीने मात्र , सदर आश्रम दुमजली असून मोकळ्या जागेत सुमारे १५०० चौरस फुटाचे बेकायदा शेडचे बांधकाम केले आहे . या बाबत तक्रारी येत असल्याने समोरच्या भागातील सुमारे ७०० चौ फु चे पत्राशेडचे बेकायदा बांधकाम जेसीबीने पाडण्यात आले होते . मागील बेकायदा शेडचे सुमारे ८०० चौफु चे बांधकाम पडायचे असून पक्क्या इमारतीत सुद्धा बेकायदा फेरबदल केल्याच्या तक्रारी असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.