साधू हत्याकांडातील आरोपी कॉन्फरसिंगद्वारे विवाहात, तात्पुरता जामीन मात्र फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 02:20 PM2023-02-06T14:20:16+5:302023-02-06T14:20:55+5:30
पालघरच्या कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ १६ एप्रिल २०२० रोजी चोर-दरोडेखोरांच्या अफवेतून गुजरातमधील सुरत येथे अंत्यसंस्कारासाठी जात असलेल्या दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची निर्घृणपणे दगडाने ठेचून हत्या झाली होती.
ठाणे : पालघर जिल्ह्यातील साधूंच्या सामूहिक हत्याकांड प्रकरणातील एक आरोपी विष्णू भवर (५४) याला मुलीच्या विवाहासाठी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थितीला ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय शिर्सेकर यांनी अनुमती दिली. त्याचवेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्याने या लग्नासाठी मागितलेला दोन दिवसांचा तात्पुरता जामीन मात्र न्यायालयाने फेटाळला आहे.
पालघरच्या कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ १६ एप्रिल २०२० रोजी चोर-दरोडेखोरांच्या अफवेतून गुजरातमधील सुरत येथे अंत्यसंस्कारासाठी जात असलेल्या दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची निर्घृणपणे दगडाने ठेचून हत्या झाली होती. या हत्याकांडात १०० हून अधिक जण अटकेत आहेत. त्यातील एक आरोपी भवर याने डहाणू तालुक्यातील पिंपळशेत पाड्यातील गावठाण येथे मुलीच्या लग्नासाठी ३ ते ६ फेब्रुवारीदरम्यान तात्पुरता जामीन मिळण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.
या खटल्यात १५१ आरोपी आहेत. त्यातील काही जणांनी यापूर्वी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे केलेले अर्ज उच्च न्यायालयाने नाकारले आहेत, हे या खटल्यातील सरकारी वकील ॲड. संजय मोरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. तसेच लग्न डहाणू तालुक्यात दुर्गम भागात आहे. या सोहळ्यास पोलिसांच्या निगराणीत आरोपी हजर राहिला तरी गावकऱ्यांचा रोष असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद सहायक सरकारी अभियोक्ता संजय मोरे यांनी शनिवारी केला होता.