राम मराठे पुरस्कार उशिरा मिळाल्याचे दु:ख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:56 AM2017-11-06T03:56:23+5:302017-11-06T03:56:28+5:30
महाराष्ट्र हा संगीताचा गड आहे. पं. राम मराठे यांच्या नावाचा पुरस्कार मला ‘भारतरत्न’समान आहे. मात्र, माझ्या घरचा हा पुरस्कार असल्याने तो मला खूप आधीच मिळायला हवा होता.
ठाणे : महाराष्ट्र हा संगीताचा गड आहे. पं. राम मराठे यांच्या नावाचा पुरस्कार मला ‘भारतरत्न’समान आहे. मात्र, माझ्या घरचा हा पुरस्कार असल्याने तो मला खूप आधीच मिळायला हवा होता. उशिरा पुरस्कार मिळाल्याचे दु:ख जरूर आहे. परंतु, ‘देर आए, पर दुरुस्त आए’ अशा शब्दांत पं. भवानी शंकर यांनी रविवारी आपली नाराजी व्यक्त केली.
ठाणे महानगरपालिका आणि अ.भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखा यांच्या सहकार्याने आयोजित संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहात महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते पं. भवानी शंकर यांना ‘संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती पुरस्कार’, तर अपूर्वा गोखले यांना ‘संगीतभूषण पं. राम मराठे राज्यस्तरीय युवा पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. मंगळवारपासून सुरू झालेल्या महोत्सवाचा शनिवारी समारोप झाला.
भवानी शंकर यांनी उशिरा पुरस्कार मिळाल्याची खंत व्यक्त केल्याची महापौर शिंदे यांनी दखल घेतली. त्या म्हणाल्या की, माझ्या हातून हा सन्मान व्हायचा होता, म्हणून उशीर झाला असावा.
येत्या वर्षभरात पं. भवानी शंकर यांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असे आश्वासनही महापौरांनी दिले. पं. भवानी शंकर म्हणाले की मराठी, हिंदी या भाषांबरोबर मला आठ भाषांचे ज्ञान आहे. संगीत साधना करताना त्याचा मला लाभ झाला. भवानी शंकर यांनी त्यांच्या वडिलांची रचना असलेले शंकर तांडव सादर केले.
महापौर शिंदे म्हणाल्या की, ठाणे शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. ठाणे महापालिकेच्या करदात्यांना विकासकामे करून दिलासा देतानाच वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्र मांची मेजवानी देण्याचा प्रयत्न पालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. माझी कारकीर्द ही वादळी ठरली आहे, असे बोलले जाते. मात्र, पुढेही अशीच कारकीर्द सुरू राहील. माझी तलवार ही कधीच म्यान राहणार नाही. माझ्या कार्यकाळात शहराचे वेगळे रूप पाहायला मिळेल.