विहिरीत अडकलेल्या वानराची सुखरूप सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:59 AM2019-06-04T00:59:23+5:302019-06-04T00:59:29+5:30
सकाळी पाणी भरण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना हे वानर दिसले. त्यांनी दोरखंडाच्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले.
अंंबरनाथ : रणरणत्या उन्हात पाणी न मिळाल्याने अंबरनाथ तालुक्यातील सांबारी गावाच्या हद्दीत विहिरीत उतरलेले वानर पुन्हा वर चढता न आल्याने विहिरीत अडकून पडले होते. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या वानराला सुखरूप बाहेर काढून त्याची सुटका करण्यात ग्रामस्थांना यश आले. सांबारी गावातील दगडखाणीच्या परिसरात असलेल्या विहिरीत सकाळी ९ वाजता एक वानर पाण्यासाठी उतरले. मात्र, पुन्हा त्याला बाहेर येता न आल्याने विहिरीत अडकून पडले. सकाळी पाणी भरण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना हे वानर दिसले. त्यांनी दोरखंडाच्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, वानर योग्य प्रतिसाद देत नव्हते. या प्रकरणाची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. वनअधिकारी रमेश रसाळ आणि त्यांचे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन वानराला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. त्यांनाही यश आले नाही. अखेर, सागर साखरे या प्राणिमित्राला बोलावण्यात आले. साखरे यांना वानराची सुखरूप सुटका करण्याचा अनुभव असल्याने त्यांच्या मदतीने वानराच्या कमरेला फास टाकून त्याला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर, त्याच्या अंगावर जाळे टाकून त्याच्या कमरेचा फास काढण्यात आला. सुटका होताच वानराने धूम ठोकली आणि गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.