बांधकाम मजुरांची सुरक्षा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:59 AM2021-02-23T04:59:57+5:302021-02-23T04:59:57+5:30
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसराला लागून असलेल्या ग्रामीण भागात अनेक मोठ्या गृहनिर्माण संकुलांचे प्रकल्प सुरू आहेत. याआधीही सुरक्षिततेचे कोणतेही नियम ...
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसराला लागून असलेल्या ग्रामीण भागात अनेक मोठ्या गृहनिर्माण संकुलांचे प्रकल्प सुरू आहेत. याआधीही सुरक्षिततेचे कोणतेही नियम न पाळल्याने मजूर व कामगार इमारतीवरून खाली कोसळून ते मृत्युमुखी पडल्याच्या घटना बऱ्याच वेळा घडल्या आहेत. रविवारच्या घटनेमुळेही मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित ठिकाणी १२० खोल्या असताना १७२ मजूर राहत होते हाही हलगर्जीपणा असल्याचे उघड झाले आहेत. पोलीस प्रशासन या दुर्घटनेचा कशा प्रकारे तपास करतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
येथील पूर्वेतील उसरघर परिसरातील एका नामांकित गृहसंकुलाच्या प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या बांधकाम मजुरांच्या वसाहतीला भीषण आग लागली. आगीत एका मजुराला जीव गमवावा लागला असून अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघाती मृत्यू झालेला तपन हा एकटाच मजूर नाही. यापूर्वीही सुरक्षिततेची साधने (सेल्फी बेल्ट) न पुरवल्याने उंचावरून पडून मजुरांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मजूर पुरविणाऱ्या कंत्राटदारांवर याप्रकरणी गुन्हेही दाखल झाले आहेत. एखादी घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल होण्यासाठी बराच कालावधी लागत असल्याने यात ठोस कारवाई होते का? याबाबतही साशंकता आहे. या घटना वारंवार घडत असताना रविवारच्या घटनेत होरपळून एका मजुराचा नाहक बळी गेला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आता या दुर्घटनेची पोलीस प्रशासन गांभीर्याने दखल घेते का? मृताच्या कुटुंबाला आणि जखमी मजुराला आर्थिक मदत मिळते का? त्याचबरोबर आगीचे कारण गुलदस्त्यात राहते का? वारंवार घडणाऱ्या मजुरांच्या मृत्यूप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांना मोलाच्या सूचना केल्या जातात का? याकडे लक्ष लागले आहे.
------------------------------------------------------
पाच महिन्यांपूर्वीच झाला हाेता विवाह
आगीत मृत्युमुखी पडलेला २५ वर्षीय तपन प्रदीप महालदार हा पाच महिन्यांपूर्वीच गृहसंकुलाच्या ठिकाणी बांधकाम मजूर म्हणून कामाला लागला होता. तो मूळचा पश्चिम बंगालमधील मालदा, वजीदपूर गावचा रहिवासी असून तो विवाहित होता. त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.