न बदलता काळाच्या पडद्यावर आपली मोहोर उमटवणाऱ्या कल्याण शहराची गाथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 12:04 AM2020-05-03T00:04:31+5:302020-05-03T00:04:48+5:30
सातवाहन काळापासून ज्ञात असलेले मुंबईच्या परिसरातील दुसरे शहर म्हणजे कल्याण. साधारण दहाव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत कल्याणच्या इतिहासातील नव्या अध्यायाला सुरुवात झाली.
डॉ. सूरज अ. पंडित
सातवाहन काळापासून कल्याण, घारापुरी यासारख्या वसाहती समृद्ध झाल्या होत्या. सातवाहन काळात कल्याणला गांधारमधून आलेल्या यवनांच्या वसाहती असाव्यात, असे डॉक्टर म.के. ढवळीकर यांचे मत आहे. सहाव्या-सातव्या शतकांपासूनच कल्याणला हिंदूंबरोबरच ख्रिश्चनांचीही वस्ती असल्याचे काही लिखित साधनांच्या आधारे ज्ञात आहे. इस्लामच्या उदयानंतर थोड्याच काळात कल्याण परिसरात मुसलमानांच्या वसाहती वाढीस लागल्या. यापूर्वी आपण पाहिल्याप्रमाणे शिलाहार काळात अरब मुस्लिम, पारशी आणि हिंदू संपूर्ण उत्तर कोकणात गुण्यागोविंदाने राहत होते. अर्थात, कल्याणही याला अपवाद नसावे.
उल्हास नदी साधारण कल्याणच्या उत्तरेकडून अनेक नागमोडी वळणे घेत दक्षिणेला वळते. अशाच एका अश्वनालाकृती वळणावर प्राचीन कल्याणचे अवशेष विखुरले होते. नदीच्या पूर्वेकडील काठावर, जिथे आजही आधुनिक कल्याण वसलेले आहे, तेथे प्राचीन पुरावशेषांचे पुरातत्त्वीय टेकाड होते. आधुनिक काळातील नागरिकीकरणाच्या प्रक्रि येत हे पुरावशेष नामशेष झाले.
साधारण दहाव्या ते तेराव्या शतकापर्यंत कल्याणच्या इतिहासातील नव्या अध्यायाला सुरुवात झाली. याच काळात मध्ययुगीन कल्याणचा पाया रचला गेला. सातवाहन काळापासूनच सोपारा आणि कल्याण राजकीयदृष्ट्या दोन महत्त्वाची शहरे होती. एकूणच, या परिसरातील व्यापार, नैसर्गिक साधनसंपत्तीवर वर्चस्व गाजवण्यासाठी अनेक राजवटींमध्ये या दोन शहरांवरून युद्धे झाली, राजकीय डावपेच खेळले गेले. हे कितीही सत्य असले, तरी इतिहासात कल्याण या शहराला सोपाऱ्यानंतरचेच स्थान मिळाले.
उल्हास नदीच्या पूर्वेला जसे कल्याण आहे तसेच पश्चिमेला भिवंडी आहे. आजही कल्याण-भिवंडी ही दोन्ही जुळी शहरे म्हणून ओळखली जातात. मध्ययुगीन इतिहासात या दोन्ही शहरांनी मोलाचे योगदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आरमार बांधले, ते याच खाडीत. भिवंडी परिसरात पूर्वी काही सातवाहनकालीन वसाहती असाव्यात, असे पुरावशेषांवरून वाटत असले, तरी येथे एक नागरी वसाहत असण्याची शक्यता फारच धूसर आहे. शिलाहार काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात वसाहती झाल्या असाव्यात.
कल्याणबरोबरच भिवंडी परिसरातील कामणदुर्गापासून गुमतारादुर्गाच्या पायथ्यापर्यंत काही मंदिरांचे भग्नावशेष आपल्याला पाहायला मिळतात. उल्हास नदीच्या पूर्वेला, कल्याणच्या पलीकडील तीरावर धूळखाडी, सोनाळे, भिनार आणि लोणार परिसरात मोठ्या प्रमाणात शिलाहारकालीन स्थापत्य व शिल्पांचे भग्नावशेष सापडले आहेत. अर्थातच, आधुनिक वसाहतींनी या पुरातन ठेव्याचे मोठे नुकसान केले असले, तरी शिलाहारकालीन वसाहतींची साक्ष देणारे थोडेफार अवशेष आजही शिल्लक आहेत. लोणार येथील मंदिर व मीठ यांचे शिलाहारकालीन संदर्भ यापूर्वी आपण पाहिले आहेत. कालक्र मदृष्ट्या या साºया अवशेषांचा काळ दहाव्या ते तेराव्या शतकापर्यंत जातो. पंधराव्या शतकापर्यंत कोणतेही महत्त्वाचे पुरावशेष या परिसरात पाहायला मिळत नाहीत.
सोपाºयाप्रमाणे सातवाहन काळापासून ज्ञात असलेले मुंबईच्या परिसरातील दुसरे शहर म्हणजे कल्याण. साधारण दहाव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत कल्याणच्या इतिहासातील नव्या अध्यायाला सुरुवात झाली. पंधराव्या शतकापासून पुढे अगदी एकविसाव्या शतकापर्यंत कल्याणचा-भिवंडीचा इतिहास ज्ञात आहे. ही सातवाहन काळात सुरुवात झालेली वसाहत मानवी इतिहासाच्या विविध टप्प्यांत बहरत गेली. शिलाहार काळात तर नक्की या शहराचा पसारा किती होता, हे सांगणे कठीण आहे. उत्तरोत्तर उन्नत होत जाणारी आर्थिक परिस्थिती, हेच कल्याणच्या दोन हजार वर्षांच्या नागरी इतिहासाचे गमक होते. हीच आहे, गेल्या दोन हजार वर्षांत स्वत:चे नाव यत्किंचितही न बदलता काळाच्या पडद्यावर आपली मोहोर उमटवणाºया कल्याण शहराची गाथा.
(लेखक साठ्ये महाविद्यालयात प्राचीन भारतीय संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाचे विभागप्रमुख आहेत.)