लघुगीत स्पर्धेमध्ये सागर मिठबावकर प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 12:07 AM2020-12-08T00:07:21+5:302020-12-08T00:07:48+5:30
Badlapur News : ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ यावर कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने घेतलेल्या लघुगीत स्पर्धेत ‘पुढचं पाऊल’फेम तुक्या अर्थात सागर मिठबावकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
बदलापूर : ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ यावर कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने घेतलेल्या लघुगीत स्पर्धेत ‘पुढचं पाऊल’फेम तुक्या अर्थात सागर मिठबावकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. मिठबावकर यांनी अवघ्या तीन मिनिटांच्या लघुगीतातून नागरिकांमध्ये शहर स्वच्छतेबाबत जनजागृतीचा उत्तम प्रयत्न केला आहे.
सागर यांनी या गीतातून आपले शहर हा आपला अभिमान असल्याचे सांगून आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा. पान, गुटखा खाऊन रस्त्यावर कुठेही थुंकू नका, ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करा, आपल्या चांगल्या आरोग्यासाठी झटणाऱ्या प्रशासनाला सहकार्य करा, अशा बाबी गीतातून मांडल्या आहेत. गीताची चालही उत्तम जमल्याने सोशल मीडियावरही त्यांच्या गाण्याला चांगली पसंती मिळत आहे. सागर यांनी हे गीत लिहिले असून संदीप कांबळे यांनी ते गायले आहे. मेघनाथ खंडागळे, विजय कांबळे यांनी त्यांना साथ दिली आहे. संदीप डावरे संगीतकार असून, यश मिठबावकर यांनी व्हिडीओ चित्रण केले आहे.
कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने तीन विविध गटांत ही स्पर्धा घेतली. त्यातील १७ ते ३५ वयोगटातील लघुगीत स्पर्धेत सागर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. १० ते १६ या वयोगटात प्रणाली भागवत हिने, तर ३६ व त्यापुढील वयोगटात प्रदीप गर्जे व शिवाजी सांगळे यांनी क्रमांक पटकावला आहे.
निबंध स्पर्धेत १० ते १६ वयोगटात प्रणाली भागवत हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. १७ ते ३५ वयोगटात नेहा आंबोले यांनी प्रथम तर विशाल मसुरकर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
विशेष कौशल्य असणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नगर परिषदेने ही स्पर्धा घेतली होती. विजेत्यांना बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
लघुपट स्पर्धेत विशाल मसुरकर यांची बाजी
लघुपट स्पर्धेत विशाल मसुरकर यांनी प्रथम, राज बांगर यांनी द्वितीय तर रोहित भोईर यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे.
चित्रकला स्पर्धेत १० ते १६ वयोगटात हर्ष कोल्हे याने प्रथम, निकिता जाधव हिने द्वितीय, तर पालवी लिकाहर हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे.
nया स्पर्धेतील सर्व विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव हाेत आहे.