"साहेब आता तरी एकत्र या", ठाण्यातही लागले मनसे-शिवसैनिकाचे एकत्रित बॅनर!
By अजित मांडके | Published: July 4, 2023 03:05 PM2023-07-04T15:05:31+5:302023-07-04T15:06:01+5:30
मुंबईत मनसे आणि शिवसैनिकांनी उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी बॅनरबाजी केली आहे.
ठाणे : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्यात राजकीय उलथा पालथ सुरु झाल्या आहेत. मुंबईत मनसे आणि शिवसैनिकांनी उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी बॅनरबाजी केली आहे. त्यात आता ठाण्यातही मनसे आणि शिवसैनिकांनी ठाण्यात साहेब आता तरी एकत्र या अशी साद घालणारे बॅनर लावले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज, उद्धव एकत्र येण्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक आतुर झाल्याचेच दिसत आहे.
एक वर्षापूर्वी शिवसेनेतून फुटून शिंदे यांनी वेगळा गट तयार केला आणि भाजप बरोबर सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर आता बरोबर एक वर्षानंतर राष्ट्रवादीतही फुट पडली आणि अजित पवार यांनी वेगळी चुल मांडली व सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे राज्यातील राजकारण कोणत्या पातळीवर गेले आहे, याची चुणक आता सर्वांनाच लागली आहे. त्यामुळे या सर्वांना रोखायचे असेल तर उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी साद घातली जात आहे. वर्षभरापूर्वी देखील अशीच साद दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घातली होती. त्यानंतर आता पुन्हा तशीच साद आता मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते घालू लागले आहेत.
ठाण्यात लागलेल्या याच आशयाच्या बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे. या बॅनरवर साहेब आता तरी एकत्र या अशी साद घातली गेली आहे. महाराष्ट्राला तुमची खूप गरज आहे... बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ आहे... आम्हाला महाराष्ट्रात फक्त ठाकरे सरकार पाहिजे असे देखील या बॅनरवर नमुद करण्यात आले असून साहेब एकत्र या... असे म्हंटले आहे. त्यावर मनसेच्या प्रविण बेलोसे आणि शिवसेनेच्या प्रविण उतेकर यांच्या नावाचा उल्लेख आहे. बॅनरच्या मध्यभागी बाळासाहेबांचे छायाचित्र असून त्यांच्या दोन्ही बाजूला राज आणि उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र असल्याचे दिसत आहे.