माहुली किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठानची गडसंवर्धन स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:39 AM2019-03-16T00:39:00+5:302019-03-16T00:39:18+5:30
शहापूर येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या सभासदांनी संयुक्त गडसंवर्धन आणि स्वच्छता मोहिमेंतर्गत माहुली किल्ल्यावर नुकतीच स्वच्छता मोहीम राबवली.
शहापूर : शहापूर येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या सभासदांनी संयुक्त गडसंवर्धन आणि स्वच्छता मोहिमेंतर्गत माहुली किल्ल्यावर नुकतीच स्वच्छता मोहीम राबवली. या उपक्र माबद्दल सहभागी सर्वांचे अभिनंदन केले जात आहे.
दुर्गसंवर्धन आणि स्वच्छता मोहीम याअंतर्गत सह्याद्री प्रतिष्ठानच्या सभासदांनी महादरवाजा परिसरात गोमुखी बुरुजाच्या निखळलेले चिरे आणि पायऱ्या बाजूला करून साधारण १० पायऱ्या पूर्ववत करण्यात आल्या. तसेच अनेक ठिकाणी तटबंदीत आलेले तण आणि झुडुपे काढून तटबंदी मोकळी करण्यात आली. तर, महादरवाजा आणि देवड्याजवळील परिसर स्वच्छ करण्यात आला. महादरवाजाच्या पुढील जागा स्वच्छ राहावी, म्हणून पाणी जाण्यासाठी योग्य मार्ग करण्यात आला आणि गडावरील बाटल्या, प्लास्टिक बॉटल, रॅपरचा कचरा जमा करून गडाखाली आणण्यात आला.
दुर्गसंवर्धन आणि स्वच्छता मोहिमेंतर्गत सह्याद्री प्रतिष्ठान गेली तीन वर्षे सातत्याने हा उपक्र म माहुली किल्ल्यावर राबवत आहे. या मोहिमेत अनेक संस्थांनी सहभाग घेतला. तर, प्रतिष्ठानच्या मिशन १०० मोहिमेंतर्गत किल्ल्यावर लोकसहभागातून दिशादर्शक तसेच स्थलदर्शक फलक लावण्यात आल्याचे सह्याद्री प्रतिष्ठान, शहापूर विभाग अध्यक्ष गौरव राजे यांनी सांगितले. या मोहिमेत गणेश पवार, तेजस उदिवाल, अंकित लिंगायत, स्वप्नाली वाळके, रोहन जोशी, सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभाग टीम, विवेक निनावे आणि दुर्गप्रेमी सहभागी झाले होते. हा वेगळा अनुभव असल्याचे यावेळी सांगण्यात आले.