साईशक्ती दुर्घटना; सरकारकडून मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 06:41 AM2021-05-30T06:41:50+5:302021-05-30T06:42:05+5:30
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
उल्हासनगर : कॅम्प नं. २, नेहरू चौक येथील साईशक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब शुक्रवारी रात्री ९.३० वाजता तळमजल्यापर्यंत कोसळून ७ जणांचा मृत्यू, तर १ जण जखमी झाला. इमारतीचा मध्यरात्रीपर्यंत ढिगारा उचलण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत सरकारच्या वतीने जाहीर केली. दरम्यान, इमारतीचे स्लॅब कोसळून १५ दिवसांत १२ जणांचे मृत्यू झाले आहेत.
कॅम्प नं. २ मधील साईशक्ती इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब शुक्रवारी रात्री तळमजल्यावर पडून ढिगाऱ्याखाली ७ जण दबल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांना मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखालून ५ जणांचे मृतदेह काढल्यानंतर त्यांच्या मदतीला टीडीआरएफची टीम आली. त्यांच्या मदतीने आणखी दोन मृतदेह बाहेर काढले. असे एकूण ७ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आले, असे सांगण्यात आले, तर एक जण जखमी झाला. त्यानंतर प्रभाग अधिकारी गणेश शिंपी यांनी इमारत सील केली. यावेळी घटनास्थळी पालकमंत्री शिंदे, आमदार कुमार आयलानी, आयुक्त डॉ. राजा दयानिधी आदी उपस्थित होते.
जखमी व्यक्तीला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याचे नाव अलगोत नायडर (६०) आहे, तर मृत्यू झालेल्यांमध्ये पुनीत चांदवानी (१७), दिनेश चांदवानी (३५), दीपक चांदवानी (४२), मोहिनी चांदवानी (६५), कृष्णा इनूचंद बजाज (२४), नम्रता मूलचंद बजाज (२१) व लवली बजाज (४६) यांचा समावेश आहे. चांदवानी कुटुंब इमारतीच्या पाचव्या मजल्यावर, तर बजाज कुटुंब पहिल्या मजल्यावर राहत होते.
फ्लॅट ३०४ व ४०४ हे रिकामे होते, तर २०२ फ्लॅटमधील रहिवासी बेडरूममध्ये होते, अशी माहिती शिंपी यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी बोलून शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी या वेळी दिले. उल्हासनगरात १९९२ ते ९६ दरम्यान रेती बंद असल्याने बहुतांश बांधकामे दगडाच्या बारीक चुऱ्यातून झाली आहेत. याचदरम्यान बांधण्यात आलेल्या बहुतांश इमारतींचे स्लॅब कोसळून बळी जात आहेत.
इमारतीमधील १५ कुटुंबे थारासिंग दरबारात
साईशक्ती इमारत पालिकेने रात्री सील केली. एकूण २९ फ्लॅटपैकी अर्धेअधिक फ्लॅट हे रिकामे असून, इतर कुटुंबांची थारासिंग दरबारमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. दागिने, संसारोपयोगी वस्तू काढण्यासाठी बेघर झालेल्या कुटुंबांना शनिवारी परवानगी देण्यात आली.