उल्हासनगरातील साई वसंतशहा उद्यान इतिहासजमा; जेसीबीनं बांधकाम उद्ध्वस्त
By सदानंद नाईक | Published: March 25, 2024 06:10 PM2024-03-25T18:10:14+5:302024-03-25T18:10:28+5:30
काही वर्षानंतर उद्यानाची जागा रस्त्यात व एका खाजगी सोसायटीच्या जागेत येत असल्याचा साक्षात्कार महापालिका, सोसायटी व स्थानिक माजी नगरसेवकांना झाला.
उल्हासनगर : कॅम्प नं-४, व्हीनस चौक परिसरात लाखोंच्या निधीतून उभारलेल्या साई वसंतशहा उद्यान इतिहास जमा झाले. उद्यानाची जागा एका खाजगी जागेत येत असल्याचा साक्षात्कार झाल्याने, जेसीबी मशिनद्वारे उद्यान पाडून टाकण्यात आले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, व्हीनस चौक येथील मोर्यांनगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाजी मार्केटसह अन्य दुकाने गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात होते. महापालिकेने भाजी मार्केट व दुकाने अवैध असल्याचे सांगून जमीनदोस्त केली. खाली झालेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून नागरिकांसाठी त्याजागी लाखो रुपयांच्या निधीतून तत्कालीन नगरसेवकांच्या प्रस्तावानुसार महापालिकेने साई वसंत शहा उद्यान उभारले. उद्यानाचे तत्कालीन कॅबिनेट मंत्री, नगरसेवक, तत्कालीन महापालिका आयुक्त, महापौर आदींच्या हस्ते थाटामाटात उदघाटन झाले. काही वर्षानंतर उद्यानाची जागा रस्त्यात व एका खाजगी सोसायटीच्या जागेत येत असल्याचा साक्षात्कार महापालिका, सोसायटी व स्थानिक माजी नगरसेवकांना झाला. सुरवातीला उद्यानाची भिंत पाडल्यावर आरोप व प्रत्यारोप झाला. मात्र कालांतराने याबाबत आवाज उठणे बंद झाले. अखेर जेसीबी मशिनद्वारे उद्यान नष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेने लाखोच्या निधीतून व्हीनस चौकात उभारलेले साई वसंतशहा उद्यान रस्त्यात व सोसायटीच्या जागेत येते? हे महापालिका अधिकाऱ्यांना माहीत नव्हते का? असा प्रश्न स्थानिक नागरिक व विविध राजकीय पक्षाचे नेते विचारीत आहेत. सोसायटीच्या आड येणाऱ्या भाजी मार्केट व अन्य दुकाने हटविण्यासाठी, महापालिकेने उद्यान बांधण्याचा घाट घातला होता का? असा प्रश्नही विचारला जात आहे. लाखोंच्या निधीतून बांधलेले साई वसंतशहा उद्यान जेसीबी मशीनद्वारे पाडण्याचा आदेश दिला कोणी? आदी अनेक प्रश्न या उद्याना निमित्ताने उभे ठाकले आहे. भूमाफियांचा महापालिका मालमत्तावर डोळा असून कॅम्प नं-५, मासे मार्केट येथील महापालिका शाळा मैदानावर सनद काढल्याचा प्रकार उघड झाला. शाळा मैदानावरील सनद रद्द करण्याचा प्रकारही थंड पडल्याचा आरोप होत आहे.
साई वसंतशहा उद्यानाची माहिती घेणार - आयुक्त अजीज शेख
महापालिकेने कॅम्प नं-४, व्हीनस चौक येथे बांधलेल्या साई वसंतशहा उद्यानाबाबत माहिती घेऊन योग्य कारवाई करतो. जागा रस्त्यावर व खाजगी सोसायटीत येत असल्यावरही उद्यान बांधले कसे? याची चौकशी करणार आहे.