काटई-कोळे येथील सखाराम शेठ विद्यालयाची पन्नाशी, मराठी माध्यमाच्या शाळेची आशादायी वाटचाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 04:30 PM2017-12-25T16:30:30+5:302017-12-25T16:32:00+5:30
शिक्षणात प्रगत झाल्याचा दावा करणा-या सरकारने कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत चालल्याने राज्यभरातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्रजीला वाढावा दिल्याने मराठी शाळा बंद पडत असताना काटई कोळे गाव या ग्रामीण भागातील सखाराम शेठ या शाळेने तब्बल 50 वर्षाची वाटचाल पूर्ण केली आहे.
डोंबिवली : शिक्षणात प्रगत झाल्याचा दावा करणा-या सरकारने कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत चालल्याने राज्यभरातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्रजीला वाढावा दिल्याने मराठी शाळा बंद पडत असताना काटई कोळे गाव या ग्रामीण भागातील सखाराम शेठ या शाळेने तब्बल 50 वर्षाची वाटचाल पूर्ण केली आहे. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सखाराम शेठ विद्यालयाची ही पन्नाशी खरोखरच चर्चेचा आणि उल्लेखनिय शैक्षणिक कार्याचा एक चालते बोलते उदाहरण ठरले आहे.
या परिसरातील आागरी नेतृत्व असलेल्या सखाराम शेठ, रतनबुवा पाटील, नकूल पाटील आणि कान्हा पाटील या मंडळींनी मिळून 50 वर्षापूर्वी ग्रामीण भागातील तळागाळातील आगरी समाजातील मुलांना व शेतक-यांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शाळा सुरु केली. शाळा अत्यंत छोट्याशा वास्तुत सुरु करण्यात आली होती. त्यासाठी शेतकरी जागृती मंडळाची स्थापना करण्यात आली होती. या मंडळाने या शाळेचा कारभार पाहिला आहे. या मंडळाने ही शाळा तब्बल 50 वर्षे चांगल्या प्रकारे चालविली आहे. एक मराठी शाळा मराठीविषयी प्रतिकूल वातावरण असताना 50 वर्षे चालते. त्यातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. त्यांच्या यशाकडे वाटचाल करतात. हे शाळेसाठी समाधानकारक आहे. शाळेचे अध्यक्ष व माजी विद्यार्थी रमेश पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन लोकवर्गणीतून शाळेच्या नव्या इमारतीचे बांधकाम केले. इंग्रजी शाळांना लाजवेल असे सखाराम शेठ विद्यालयाचे रुप पालटले. आजही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सखाराम शेठ विद्यालय हे हक्काचे घर आहे. त्याठिकाणी विद्यार्थ्याला प्रवेश हमखास मिळतो. सरकारकडून मराठी माध्यमाच्या शाळांची गळचेपी केली जात असताना सखाराम शेठ विद्यालय आजही सुरु आहे. प्रतिकूल परिस्थितीत शाळेची 50 वर्षाची वाटचाल ही खरोखरच वाखाणण्या जोगी आहेत. शाळेने 50 वर्षा निमित्त 23 तारखेपासून विविध कार्यक्रम आयोजित केले होते. त्यात आंतरशालेय स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम होते. त्यात विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला. त्यात शिक्षणक वृंदानेही चांगली मेहनत घेतली. आजच्या शेवटच्या दिवशी शाहीर नंदेश उमप यांनी लोकसंस्कृतीचा जागर घातला. तर गायक स्वप्नील बांदोडकर व वेला शेंडे यांच्या गाण्यांनी सगळ्य़ांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत जात असताना त्याचा कळस गाठला तो चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने सगळ्य़ांच्या पोट्यात यावेळी हसून हसून गोळा आाहे. विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळया, भरविलेले विज्ञान प्रदर्शन आणि भजन स्पर्धेला उपस्थित मान्यवरांनी चांगली दाद दिली.