पगार सरकारचा; कारभार खाजगी दवाखान्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 06:49 AM2018-03-08T06:49:49+5:302018-03-08T06:49:49+5:30
मुरबाड तालुक्याचा पसारा पाहता शासनाने मुरबाड आणि त्यानंतर टोकावडे येथे ग्रामीण रुग्णालय निर्माण केले. टोकावडे येथे कर्मचारीवर्ग कमी असला तरी मुरबाड येथे कर्मचाºयांसह वैद्यकीय अधिकारी, पुरेसा औषधसाठा, रुग्णवाहिका, व्हेंटिलेटरसह जोडीला १०८ अशी व्यवस्था मुरबाड रुग्णालयात करून दिलेली आहे.
मुरबाड : मुरबाड तालुक्याचा पसारा पाहता शासनाने मुरबाड आणि त्यानंतर टोकावडे येथे ग्रामीण रुग्णालय निर्माण केले. टोकावडे येथे कर्मचारीवर्ग कमी असला तरी मुरबाड येथे कर्मचाºयांसह वैद्यकीय अधिकारी, पुरेसा औषधसाठा, रुग्णवाहिका, व्हेंटिलेटरसह जोडीला १०८ अशी व्यवस्था मुरबाड रुग्णालयात करून दिलेली आहे. मात्र, येथील वैद्यकीय अधिकारी हे पगार शासनाचा घेत असले तरी कारभार मात्र खाजगी रुग्णालयाचा करतात, असे वास्तव उघडकीस आल्याने मुरबाड रुग्णालयाची आरोग्य सेवा रामभरोसे झाली आहे. याबाबत, चौकशी करून मनसेने कारवाईची मागणी केली आहे.
मंगळवारी सकाळीदेखील मुरबाड ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेस येथे प्रसूती होणार नसल्याचे सांगून उल्हासनगरला पाठवले. या महिलेला १०८ या रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. मात्र, दोन किमी अंतरावर गेल्यानंतर या महिलेची या रुग्णवाहिकेत नैसर्गिक प्रसूती झाली. अशा पद्धतीने मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचा कारभार मनमानीपणे सुरू असल्याने याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे मुरबाड शहरप्रमुख नरेश देसले यांनी शासनाकडे केली आहे.
मुरबाड तालुक्यात आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजले असून योग्य उपचार मिळत नाहीत, म्हणून सरकारी दवाखाने ओस पडू लागले आहेत. येथील ग्रामीण रुग्णालयावर येणारा ताण लक्षात घेऊन माजी आ. गोटीराम पवार आणि आ. किसन कथोरे यांनी टोकावडे येथे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय उभे केले. त्यामुळे मुरबाडला जाणारे रुग्ण टोकावडे येथे उपचार घेऊ लागले. मात्र, तालुक्यातील तीन चतुर्थांश भाग मुरबाड ग्रामीण रु ग्णालयावर अवलंबून असल्याने शासनाने येथे तज्ज्ञ डॉक्टर्ससह सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तरीही, या रुग्णालयातील खाटा रिकाम्या दिसू लागल्या. याबाबत, माहिती घेतली असता येथील वैद्यकीय अधिकारी राजन पोरे सेवानिवृत्त झाल्यावर येथील डॉक्टर ए.जी. शिंदे यांना प्रभारी निवासी वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले. आणखी दोन डॉक्टर हेमंतकुमार खंबायत आणि संगीता जाधव असे डॉक्टर कार्यरत असताना वैद्यकीय अधिकारी ए.जी. शिंदे हे रुग्णालयात फक्त क्वचितच येतात. ते वाशी येथे खाजगी रुग्णालय चालवत असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी डॉ. शिंदे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. केम्पी पाटील यांनी डॉक्टर फड यांची बेकायदेशीर नियुक्ती करून मुरबाड ग्रामीण रुग्णालयात अनागोंदी माजवली आहे. डॉ. फड यांना अनेक वर्षांपासून या दवाखान्यात ११ महिन्यांच्या करारावर शासनाने नियुक्त केले होते. त्यांचा करार ३१ मार्च २०१७ ला संपला असतानाही ते येथे तळ ठोकून बसले आहेत. याबाबत, माहिती घेतली असता डॉ. शिंदे हे स्वत:चा खाजगी दवाखाना वाशी येथे चालवत आहेत. त्यांनी आणि डॉ. केम्पी पाटील यांनी आपल्या मर्जीनुसार डॉक्टर फड यांना बेकायदेशीररीत्या कामावर ठेवले असून त्यांच्यामार्फत या दोन अधिकाºयांनी मुरबाडच्या गोरगरीब जनतेची लूट सुरू केली आहे. फड हे आलेल्या रुग्णाला खाजगी रुग्णालयाची वाट दाखवतात. प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना येथे आॅपरेशन थिएटर नसल्याचे कारण देऊन खाजगी दवाखाना नाहीतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवले जाते. मात्र, तेथे गेल्यानंतर संबंधित महिलेची नैसर्गिकरीत्या प्रसूती होते.
सरकारी रुग्णालय म्हटले की, तपासणीसह औषधोपचार मोफत दिले जातात. मात्र, येथे खाजगी मेडिकलमधून रुग्णाला औषधे आणण्यास भाग पाडले जाते. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी शिंदे हे निवासी वैद्यकीय अधिकारी आणि स्त्रीरोगतज्ज्ञ असून ते येथे राहत नसल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला खाजगी रुग्णालय किंवा उल्हासनगर येथे जावे लागते. जिल्हा शल्य चिकित्सक केम्पी पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले, जिल्ह्याचा कारभार मला पाहावा लागत असल्याने मी कुठेकुठे लक्ष ठेवणार? तर डॉक्टर फड यांचा करार संपला असतानाही ते कार्यरत कसे, असे विचारले असता तुम्ही काळजी करू नका, त्यांच्या पगाराची व्यवस्था मी करतो, असेही ते म्हणाले.