हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची रोखणार वेतनवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:54 AM2021-02-20T05:54:45+5:302021-02-20T05:54:45+5:30
मीरा रोड : कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाला आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या शासन नियमावलीची आठवण झाली ...
मीरा रोड : कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाला आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या शासन नियमावलीची आठवण झाली आहे. आयुक्तांनी शुक्रवारी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आधी दिलेली जबाबदारी पार न पाडणाऱ्या प्रभाग अधिकाऱ्यांना एक वेतनवाढ रोखण्याची नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या रुग्णांची मध्यंतरी कमी होत चाललेल्या संख्येमुळे बहुतांश प्रशासन-लोकप्रतिनिधी व राजकारण्यांसह नागरिकांमध्ये मास्क न घालणे आदी अत्यावश्यक गोष्टींकडे कानाडोळा केला गेला. मास्क न घालण्यासह निर्देशांचे पालन होत नसताना दुसरीकडे अनलॉकमुळे लोकांची गर्दी वाढली. रेल्वे, बस, रिक्षा मध्येही लोक मास्क न घालता फिरू लागले. सार्वजनिक ठिकाणीही निर्देशांचे उल्लंघन होत आहे. पालिका मुख्यालयातही अनेक जण मास्क न घालता वावरतात; परंतु कार्यवाहीच केली जात नाही.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत मुख्यमंत्र्यांनीही चिंता व्यक्त केल्यानंतर आता प्रशासन पुन्हा खडबडून जागे झाले आहे. मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी पालिका व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी पोलीस अधिकारी आले नसले तरी पालिका अधिकारी उपस्थित होते. बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आधी दिलेल्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांची एक वेतनवाढ रोखण्याची नोटीस बजावण्यात यावी असे ठरले. प्रभाग अधिकाऱ्याने रोज लग्न सभागृह, हॉटेल, मॉल, क्लासेस आदींपैकी किमान तीन ठिकाणी भेटी देऊन नियमावलींचे पालन होते की नाही हे पाहायचे आहे.
प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्याने मास्क न घालणाऱ्या किमान १०० जणांकडून दंड वसूल करणे व मास्क वाटप करणे. प्रभाग अधिकाऱ्यांनी कंटेनमेंट झोन जाहीर करणे व ३०० जणांची कोरोना चाचणी करून घेणे. कंटेनमेंट झोन मध्ये दर रविवारी सोडियम क्लोराईडची फवारणी करणे, चाचण्यांची संख्या वाढवणे, कोरोना कॉलसेंटरला मुदतवाढ देणे, अतिरिक्त आयुक्तांनी सोमवारी आढावा बैठक घेणे आदी निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, सदर बैठकीस गैरहजर राहणाऱ्या सहाय्यक आयुक्त सचिन बच्छाव यांना नोटीस बजावली जाणार आहे.