पगार महापालिकेचा, कामे मात्र इतर आस्थापनांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 12:22 AM2020-12-18T00:22:58+5:302020-12-18T00:23:02+5:30
उल्हासनगरमधील प्रकार; कुणी दिला होता आदेश? ७० टक्के अधिकाऱ्यांची पदे रिक्त
उल्हासनगर : महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असताना तब्बल १४ कर्मचारी मंत्रालय, उल्हासनगर, अंबरनाथ तहसील व कल्याण पूर्व विधानसभेसाठी वर्षानुवर्षे काम करीत असल्याचे उघड झाले. पगार महापालिकेचा, कामे इतरांची का, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर, कर्मचाऱ्यांना परत बोलावणार असल्याची प्रतिक्रिया उपायुक्त मदन सोंडे यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेत ७० टक्के अधिकारी व ४० टक्क्यांपेक्षा कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी मिळत नसल्याने वर्ग-१ व २ च्या पदावर कनिष्ठ व वरिष्ठ लिपिकांची वर्णी लावण्याची वेळ प्रशासनावर आली होती. महापालिका आस्थापनेवरील १४ कर्मचारी यांना संबंधित विभागाचा कोणताही अधिकृत आदेश नसताना मंत्रालयात मधुरा केणी, सुनील वलेचा, गौरव जेधे तर कल्याण पूर्व विधानसभा कामासाठी रवींद्र दंगगव्हाळ, विशाल ढोले, सुधाकर पाटील, उल्हासनगर तहसील कार्यालयात दीपक कानोजिया, संदीपान जाधव, किशोर अल्हाट, शरद पाटील, अशोक छोकर तसेच अंबरनाथ तहसीलमध्ये साईनाथ चौधरी, अजय जाधव व अनिकेत आदी वर्षानुवर्षे काम करीत आहेत. महापालिकेचा पगार घेणारे हे कर्मचारी २०११ नंतर अन्य आस्थापनात काम करीत आहेत. पालिकेचा पगार घेणारे कर्मचारी कुणाच्या आदेशानुसार दुसरीकडे काम करीत आहेत, असा प्रश्न विचारला जात असून विभागासह महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
कर्मचाऱ्यांना परत बोलावणार
महापालिकेचे १४ कर्मचारी वर्षानुवर्षे मंत्रालय, कल्याण पूर्व विधानसभा, उल्हासनगर व अंबरनाथ तहसील कार्यालयात काम करीत आहेत. मात्र महापालिका सर्वांचे पगार काढत असून त्यांना पुन्हा महापालिका आस्थापनावर परत बोलावणार आहे. तसेच याबाबत संबंधित संस्थेकडून अधिकृत आदेश होता का, याबाबतही तपास करून कारवाई करण्यात येणार आहे, असे उपायुक्त मदन सोंडे यांनी सांगितले.