पाच हजार लीटर दुधाची विक्री, दूधनाक्यावर लीटरचा भाव ६५ ते ७० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:57 AM2017-10-06T01:57:28+5:302017-10-06T01:57:57+5:30
दूधविक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातील दूधनाक्यावर गुरुवारी कोजागरी पौर्णिमेनिमित्त दररोजपेक्षा दुप्पट म्हणजेच पाच हजार लीटर दुधाची विक्री झाली.
कल्याण : दूधविक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातील दूधनाक्यावर गुरुवारी कोजागरी पौर्णिमेनिमित्त दररोजपेक्षा दुप्पट म्हणजेच पाच हजार लीटर दुधाची विक्री झाली. दुधाचा भाव हा ६५ ते ७० रुपये इतका होता. तो दररोजच्या दरापेक्षा १५ ते २० रुपयांनी जास्त असूनही ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात दुधाची खरेदी केली.
कल्याण पश्चिमेत असलेल्या तबेल्यांतील ताजे दूध या नाक्यावर विकले जाते. या नाक्यावर १०० विक्रेते दुधाचा व्यवसाय करतात. दुधाचा भाव रोजच्या रोज ठरवला जातो. पहाटे ४ वाजल्यापासून या नाक्यावर दूधविक्रीला सुरुवात होते. दररोज दुधाचा भाव हा ५० ते ५५ रुपये लीटर इतका असतो. दररोज अडीच हजार लीटर दुधाची विक्री होते. मात्र, कोजागरीनिमित्त गुरुवारी हा भाव प्रतिलीटर ६५ ते ७० रुपये असतानाही पहाटे ४ ते दुपारी ३ पर्यंत दुप्पट दुधाची विक्री झाली, अशी माहिती दूधविक्रेते मजाज कर्ते, मोहम्मद हनी यांनी दिली.
कल्याणमध्ये दैनंदिन दूध घेणारे व हलवाई विविध मिठाई तयार करण्यासाठी दूधनाक्यावर दूध घेतात. कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, मुलुंड, मुंबई परिसरांतून लोक दूधनाक्यावर दूध घेण्यासाठी येतात. या भागातून तेथे दूध पोहोचवले जाते. म्हशीचे ताजे व घट्ट दूध येथे मिळते. त्यामुळे सुट्या दुधाचा भाव जास्त असला तरी ग्राहक येथे दूध विकत घेतात. दरम्यान, कोजागरीनिमित्त रात्री चंद्रप्रकाशात दूध आटवून त्याचा आस्वाद घेण्यात आला. त्यानिमित्ताने विविध सोसायट्यांच्या गच्चीवर व चाळीत विविध कार्यक्रमही रंगले होते.
स्पेशल बेंगलोरी फरसाण : आटवलेल्या दुधाबरोबर बेंगलोरी फरसाणावरही खवय्यांनी ताव मारला. हे फरसाण केवळ कोजागरीनिमित्त तयार केले जाते. ते काही ठरावीक फरसाण मार्ट व डेअरीमध्ये मिळते. अंबरनाथमधील डेअरीमालक मीनूभाई हसीजा यांनी सांगितले की, दरवर्षी कोजागरीला आम्ही बेंगलोरी फरसाण तयार करतो. लालभडक फरसाण असते. ते २०० रुपये किलोने विकले जाते. त्यात कच्ची मिरची व कच्चे टोमॅटो सजावटीसाठी ठेवले जातात. त्याला चांगली मागणी असते.