भिवंडीत बोगस खतांची विक्री; खत पाण्यात न विरघळता बनले प्लास्टिकचे बोळे
By नितीन पंडित | Published: August 3, 2023 05:28 PM2023-08-03T17:28:54+5:302023-08-03T17:29:36+5:30
शेतकऱ्याने शेतात टाकलेले खत पाण्यात न विरघळत चक्क प्लास्टिकचे गोळे बनल्याने हा आश्चर्यकारक प्रकार पाहून येथील शेतकरी हैराण झाले आहेत.
भिवंडी: भिवंडीत बोगस खत विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्याने शेतात टाकलेले खत पाण्यात न विरघळत चक्क प्लास्टिकचे गोळे बनल्याने हा आश्चर्यकारक प्रकार पाहून येथील शेतकरी हैराण झाले आहेत. याप्रकरणी त्रस्त शेतकऱ्याने गुरुवारी तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे निवेदन सादर करून बोगस खत विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या खतांचा पुरवठा शासनाच्या अधिकृत कृषी सेवा केंद्रातून होत असताना अंबाडी परिसरातील शेतकऱ्यांना विक्री केलेली खते ही बोगस असल्याची व त्यासोबतच खतांच्या किमतीपेक्षा अधिक पैसे घेतल्याची तक्रार शेतकऱ्यांनी तहसीलदारांना देत दिलेल्या निवेदनात केले आहे.
अंबाडी ,दाभाड,दिघाशी या परिसरात मोठ्या प्रमाणावर आज ही भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.तेथील असंख्य शेतकऱ्यांनी दाभाड येथील पल्लवी कृषी सेवा केंद्रातून १८:१८:१० हे खत खरेदी केले होते.परंतु मागील काही दिवसात झालेल्या पावसात शेतात टाकलेले खत हे पाण्यावर तरंगताना दिसले.त्यामुळे शेतकरी शिवाजी राऊत यांनी शंका घेऊन तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.त्यानंतर कृषी अधिकारी राहुल शिरसाड,पंचायत समिती कृषी अधिकारी निता गवळी व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली असता खत विक्री दुकानातील प्रतिनिधी ज्ञानेश्वर काचवे यांनी सुध्दा खत पाण्यावर तरंगत असल्याचे जबाबात मान्य केले आहे.
भात लागवड जोमाने व्हावी यासाठी शेतकरी पदरमोड करून खत खरेदी करीत आहे पण ते बोगस निघाल्याने त्याचा परिणाम शेती उत्पन्ना वर होणार असल्याने शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानास कोण जबाबदार राहणार असा सवाल शेतकरी शिवाजी राऊत यांनी निवेदनात उपस्थित केला आहे.तर या भागात युरिया खत हे शासनाने जाहीर केलेल्या किमतीपेक्षा अधिक किमतीला विक्री केले जात असल्याची तक्रार देखील शिवाजी राऊत यांनी तहसीलदार अधिक पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.