‘नैसर्गिक’च्या नावाखाली रासायनिक रंगांची विक्री; प्लास्टीकच्या पिशव्या, फुगेही बाजारात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 12:22 PM2024-03-19T12:22:18+5:302024-03-19T12:24:46+5:30
ग्राहकांच्या उत्साहाचा होणार ‘बेरंग’.
ठाणे : पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढण्याबरोबर सण, उत्सवही पर्यावरणस्ने व्हावेत, यासाठी विविध पर्यावरणप्रेमी संस्था, अभ्यासक, तज्ज्ञ जनजागृती करीत असताना होळीच्या निमित्ताने बाजारात येणारे रंग हे नैसर्गिक नव्हे, तर रासायनिक असल्याचे दिसून येत आहे. निसर्ग जपणाऱ्या ग्राहकांना अक्षरश: फसविले जात असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे. या सणाला गालबोट लावणाऱ्या रासायनिक रंगांसह प्लास्टीकच्या पिशव्या, फुगेही सर्रास विकले जात असल्याचे बाजारपेठांमध्ये दिसत आहे.
आजच्या काळात धुळवडीचे स्वरूप बदलून गेले आहे. नैसर्गिक रंगांची जागा रासायनिक प्रक्रियेने तयार केलेल्या रंगांनी घेतली. दोन आठवड्यांपासून प्लास्टिकच्या पिशव्या, फुगे आणि विविध रंगांचे गुलाल विक्रीस आले असून, रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशव्या मारण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू झाले आहेत. त्यामुळे इकोफ्रेंडली नव्हे, तर ही रासायनिक रंगांची होळी अशी म्हणण्याची वेळ आल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
डोळे चुरचुरणे, लालसरपणा होणे, डोळ्यांना अंधुक दिसणे, अंधत्व येणे, त्वचेवर डाग पडणे, खाज येणे हे त्वचा विकार, श्वासातून रंग गेल्यास दम लागणे, केसांत रंग गेला तर केस गळणे, कोंड्याच्या तक्रारी होतात. तोंडात गेला तर जुलाब किंवा उलट्या होतात.
- डॉ. उदय कुलकर्णी, ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ
जैविक पदार्थांपासून बनवलेले सगळे रंग हे नैसर्गिक आहेत आणि ते पाण्यात तरंगतात. पाण्यात विरघळणारा पदार्थ हा नैसर्गिक आहे असे नाही. तोही हानिकारकच असतो. त्यामुळे या रंगांमुळे शरीरावर परिणाम होतो. हे रंग चिकटून बसले तर काढायला भरपूर वेळ लागतो. नैसर्गिक रंग झटकले तरी ते पटकन निघतात.- प्रा. विद्याधर वालावलकर, पर्यावरण अभ्यासक
या घटकांपासून बनवतात नैसर्गिक रंग -
पिवळा रंग : पिवळ्या झेंडूचे फूल, हळद
काळा रंग : गुसबेरी पल्प
गुलाबी रंग : गुलाबी कांद्याचे साल
नारिंगी रंग : नारंगी झेंडूचे फूल, बिक्साचे बी, पारिजातक देठ, वनपुष्पाची ज्योत, जांभळा रंग, जामुनच्या बिया, गुलदांडाचे फूल
सोनेरी रंग : सोनेरी रंगाच्या कांद्याची साले
लाल रंग : काथ, बीटरुट, लाल हिबिस्कस फ्लॉवर, टोमॅटो, लाल चंदन, डाळिंब
हिरवा रंग : पालक, कोथिंबीर, पुदिन्याचे पान, मोहरीचे पान, मुळा
तपकिरी रंग : तपकिरी झेंडूचे फूल
पांढरा रंग : कॉर्नफ्लोअर, तांदळाचे पीठ
विकणारा काहीही विकेल. घेणाऱ्याने नक्की आपण काय खरेदी करतोय, याचा विचार करावा. आपण हा रंग स्वत:बरोबर दुसऱ्याला लावणार असल्याने हा प्रश्न आरोग्याशी निगडीत आहे. डॉक्टरांकडे नंतर जाण्यापेक्षा कोणताही सण हा आनंदाने साजरा व्हावा, जबाबादारीने साजरा करावा. यात नागरिकांची जबाबदारी मोठी आहे - डॉ. महेश बेडेकर, पर्यावरण अभ्यासक