कोरोनाकाळात पोटाच्या खळगीसाठी दोन बालकांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:26 AM2021-07-01T04:26:53+5:302021-07-01T04:26:53+5:30
ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या टाळेबंदीचे सर्वच क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या टाळेबंदीमुळे रोजगार ...
ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या टाळेबंदीचे सर्वच क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या टाळेबंदीमुळे रोजगार बुडाले, व्यवहार ठप्प झाले, बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. यामुळे अनेकांना घरप्रपंचाचा गाडा हाकायचा कसा, असा प्रश्न पडला होता. अशातच रोजगार बुडाल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी पोटच्या मुलांची विक्री केल्याच्या दोन धक्कादायक घटनाही या काळात उजेडात आल्या आहेत. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेने दोन बालकांची विक्री उघडकीस आली आहे.
देशभरासह राज्यात मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना या आजाराने शिरकाव केला. त्यात जसजसे महिने उलटत गेले तसतसे या आजाराने रौद्ररूप धारण केल्याचे दिसून आले. या आजाराशी दोन हात करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने टाळेबंदी केल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. त्यात अत्यावश्यक सेवेतील अस्थापनांसह वाहनांना केवळ आवश्यक प्रवासासाठी मुभा दिली होती. त्यामुळे दुकानदारांसह रिक्षाचालक, टॅक्सीचालकांवरदेखील बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. कोरोना परिस्थितीत इतर अनेक समस्यांबरोबर बालकांच्या समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या बालकांचे आरोग्य, संरक्षण, बालविवाह यासारख्या समस्यांसोबतच कोविडमुळे दोन्ही पालकांच्या मृत्यूमुळे मुले अनाथ होण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. असे असताना, दुसरीकडे कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बेताची झाल्याने पोटच्या गोळ्यांची विक्री केल्याच्या दोन घटना ठाणे जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेने उघडकीस आल्या आहेत. यामध्ये कल्याण शहरामध्ये एका रिक्षाचालकाने पोटच्या मुलाला विकल्याची घटना गेल्या महिन्यात उघडकीस आली होती. तर, भिवंडी ग्रामीणमध्ये एका दाम्पत्याला अनेक वर्षांपासून मूलबाळ नव्हते. मात्र, त्यांच्याकडे अचानक सहा महिन्यांचे बाळ आढळून आले. याबाबतची माहिती जिल्हा महिला व बालविकास विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने त्या दाम्पत्याचा शोध घेऊन हा प्रकार नुकताच उघडकीस आणला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती ठाणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली.
दरम्यान, एकीकडे मुलींच्या पालन पोषणाच्या जबाबदारीतून लवकर मुक्त होण्यासाठी बालविवाहाचा घाट घातला जात असल्याच्या अनेक घटना समोर येत असताना, आता दुसरीकडे बालकांची विक्री होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे बालकांच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.