गायमुख खाडीत अनधिकृत रेतीची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:36 AM2021-07-26T04:36:20+5:302021-07-26T04:36:20+5:30
ठाणे : येथील गायमुख खाडी किनाऱ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे रेतीचा साठा केला जात आहे. ही रेती बोटीने आणून ...
ठाणे : येथील गायमुख खाडी किनाऱ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे रेतीचा साठा केला जात आहे. ही रेती बोटीने आणून मुंबई, ठाणे शहरात डंपरद्वारे विकली जात आहे, अशा आशयाची तक्रार ठाणे जिल्हा प्रशासनाकडे नुकतीच करण्यात आली आहे.
घोडबंदर रोड फाउंटन हॉटेलसमोर सागरी सुरक्षा असतानाही त्यांच्या समोरून या रेतीची वाहतूक केली जात आहे. कोळी बांधवांना मासेमारी करण्यासाठी शासनाची पावसाळ्यात दोन महिने परवानगी नसते. मात्र रेती उपसा करणाऱ्यांकडे परवानगी नसतानाही ते बोटीद्वारे रेती उपसा करण्यासह वाहतूकही बिनदिक्कत करीत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. वाळू तस्करी करणे, सरकारी महसूल बुडवणे आदीनुसार येणाऱ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर प्रशासन काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.