ठाण्यातील कृषी महोत्सवात सुमारे 90 लाखांची विक्री, पाच दिवसांत 35 हजारांहून अधिक ग्राहकांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 09:45 PM2018-03-15T21:45:27+5:302018-03-15T21:45:27+5:30
ठाण्यातील कृषी महोत्सवात पाच दिवसांत सुमारे 90 लाखांहून अधीक कृषीमालाची विक्री झाली आहे. या महोत्साला 35 हजारांहून अधीक ग्राहकांनी भेट दिली. विशेष म्हणजे काही शेतकरी व बचतगटांचा थेट ग्राहकांबरोबर संपर्क झाला असल्यामुळे, शेतकऱ्यांना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
ठाणे - ठाण्यातील कृषी महोत्सवात पाच दिवसांत सुमारे 90 लाखांहून अधीक कृषीमालाची विक्री झाली आहे. या महोत्साला 35 हजारांहून अधीक ग्राहकांनी भेट दिली. विशेष म्हणजे काही शेतकरी व बचतगटांचा थेट ग्राहकांबरोबर संपर्क झाला असल्यामुळे, शेतकऱ्यांना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
आत्मा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या वतीने आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाचे आज सूप वाजले. प्रकल्प संचालक पी. एम. चांदवडे, जिल्हा अधीक्षक एम. डी. सावंत, कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफूल्ल बनसोडे, उपविभागीय कृषी अधिकारी जे. एस. घोडके यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप झाला. या महोत्सवातून तांदूळ, गहू, कडधान्ये, सेंद्रीय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला, मध आदींबरोबरच कृषीविषयक साधने विक्रीस ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर महोत्सवात सहभागी बचतगटातील सदस्य व शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
शिवाईनगर येथील मैदानावर रविवारी सुरू झालेल्या महोत्सवाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवसापासून ग्राहकांची गर्दी उसळली होती. विशेषतः वर्षभराचा तांदूळ खरेदीसाठी ग्राहकांची पसंती होती. त्यामुळे सर्वाधिक विक्री तांदळाची झाली. तब्बल 39 लाख 30 हजारांचा तांदूळ विकला गेला. त्यापाठोपाठ 11 लाख 76 हजारांची गहू, ज्वारी आदी धान्ये, सात लाख 8 हजारांची कडधान्ये, पाच लाख 25 हजारांचे प्रक्रियायुक्त पदार्थ, दोन लाख 68 हजारांचा भाजीपाला, सहा लाखांच्या गृहोपयोगी वस्तूंची विक्री झाली. तर ठाण्यासारखा शहरी भाग असूनही साडेपाच लाखांची कृषी यांत्रिकीकरण उपकरणांची विक्री झाली, अशी माहिती आत्माचे प्रकल्प उपसंचालक बी. एम. कोळप यांनी दिली. या महोत्सवाच्या यशस्वीततेसाठी आत्माचे उपसंचालक एल. के. खुरकुटे, तालूका कृषी अधिकारी अजय पाटील यांनी प्रयत्न केले.
मांड्याला सर्वाधिक पसंती
महोत्सवातील खाद्यपदार्थांच्या स्टॉललाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अवघ्या 55 रुपयांत मिळणारा मांडा खरेदीसाठी ग्राहकांना प्रतिक्षा करावी लागत होती. त्याचबरोबर शाकाहारी-मांसाहारी पदार्थांनाही ठाणेकरांची पसंती मिळाली.