धान्य महोत्सवात ४० टनांहून अधिक विक्री
By admin | Published: May 12, 2017 01:40 AM2017-05-12T01:40:20+5:302017-05-12T01:40:20+5:30
मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आणलेल्या धान्याला ठाणेकरांनी भरभरुन प्रतिसाद देणे सुरू ठेवले आहे. विविध ठिकाणी आयोजित
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आणलेल्या धान्याला ठाणेकरांनी भरभरुन प्रतिसाद देणे सुरू ठेवले आहे. विविध ठिकाणी आयोजित केलेल्या धान्य महोत्सवात आतापर्यंत ४० टनांहून अधिक धान्याची विक्री झाली, तर आर्थिक उलाढाल ५० लाखांवर गेल्याची माहिती आयोजकांनी दिली. तूरडाळ, इंद्रायणी-बासमती तांदूळ, गहू, हरभरा, उडीद, मूग या धान्याची खरेदी ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात केल्याचे त्यांनी सांगितले.
नाम फाऊंडेशन आणि संस्कार संस्थेतर्फे ठाण्यात १ मे पासून धान्य महोत्सवाला सुरूवात झाली आहे. हिंगोली, बीड, जालना या जिल्ह्यातून ३५० शेतकऱ्यांचे धान्य या महोत्सवात आले असून यात तूरडाळ, गहू, हरभरा, उडीद, ज्वारी, बाजरी, हळद, चणाडाळ, मसाले, इंद्रायणी तांदूळ, बासमती तांदूळ यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांचे २५ प्रतिनिधी महोत्सवात सहभागी आहेत. १ मे ते ४ मे या कालावधीत गावदेवी मैदानात झालेल्या महोत्सवात २५ टन धान्याची विक्री झाली. त्यातून जवळपास १२ लाखांचे उत्पन्न मिळाले. ६ मे ते १० मे या कालावधीत पातलीपाड्यातील माझी आई शाळा येथे ९ टन धान्याची विक्री झाली आणि पाच ते सहा लाखांची उलाढाल झाली. ठाणेकरांच्या वाढत्या मागणीमुळे गावदेवी मैदानात पुन्हा धान्याचे स्टॉल लावण्यात आले. आतापर्यंत ठाणेकरांनी दिलेल्या प्रतिसादात ४० टनांच्या आसपास धान्याची उलाढाल झाल्याचे संस्कार संस्थेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी सांगितले. ११ व १२ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तूरडाळ, ज्वारी, मसाले, तांदूळ, उडीद, कडधान्य, हळद आदींचे स्टॉल लावले जाणार आहेत.