खारे पाणी झाले नाही गोड; ठाणे खाडीतील पाण्यावरील प्रक्रिया प्रकल्प रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 12:21 AM2020-03-08T00:21:28+5:302020-03-08T00:21:45+5:30
या प्रकल्पासाठी लागणारा संपूर्ण भांडवली व महसुली खर्च संबंधित ठेकेदाराने करायचा होता, तसेच हे पिण्यायोग्य असलेले पाणी ठेकेदार नमूद केलेल्या दरानुसार महापालिकेस उपलब्ध करेल.
ठाणे : भविष्यात निर्माण होणारी पाणीसमस्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने विरोधकांचा विरोध डावलून अडीच वर्षांपूर्वी खाडीतील पाण्यावर प्रक्रिया करून त्यापासून पिण्याचे पाणी तयार करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. हा संपूर्ण प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारला जाणार आहे. यासाठी ठेकेदाराला जागा देऊन वीजबिल पालिका भरणार आहे. याशिवाय प्रतिहजार लीटरमागे ६३ रुपये खर्च करून पालिका ते महागडे पाणी विकत घेणार आहे. कळव्यातील पारसिक येथे २० एमएलडीच्या प्रकल्पाचे कार्यादेश देऊन दीड वर्ष उलटले तरी प्रकल्प सुरू झाला नाही. त्याचबरोबर घोडबंदर भागात २०० एमएलडीचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव मागील एक वर्षापासून शासनाच्या लालफितीत अडकला आहे.
सध्या ठाणे शहराला विविध स्रोतांपासून दररोज ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. कपातीमुळे दररोज ३१४ दशलक्ष लीटर पाणी ठाणेकरांना मिळत आहे. उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीकपातीवर पालिकेने विविध उपाय केले. यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग व वॉटर रिसायकलिंग हे प्रकल्प हाती घेतले आहेत; परंतु पालिकेला स्वत:ची पाणीपुरवठा योजना अद्याप राबवता आलेली नाही, त्यामुळे पालिकेने खाडीतील पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करून त्याचा वापर पिण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला. पीपीपी तत्त्वावर खाडीतील पाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार असून, यासाठी मे. अॅक्वालँग इंडिया प्रा. लि. कंपनीला (पुणे) यांना हे काम देण्याचे निश्चित करण्यात आले. खाडीकिनारी तांत्रिकदृष्ट्या सुयोग्य ठिकाणी २० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा प्रक्रिया (विक्षारण) प्रकल्प उभारून पिण्यायोग्य पाणी तयार करण्यात येणार होते. या कामासाठी पालिकेने सल्लागार नेमण्यासाठी १५ लाखांचा खर्च केला आहे.
देखभालीचा २५ वर्षे खर्च ठेकेदार करणार
या प्रकल्पासाठी लागणारा संपूर्ण भांडवली व महसुली खर्च संबंधित ठेकेदाराने करायचा होता, तसेच हे पिण्यायोग्य असलेले पाणी ठेकेदार नमूद केलेल्या दरानुसार महापालिकेस उपलब्ध करेल. हे पाणी बाटलीत उपलब्ध होणार होते, तसेच हे विकून ठेकेदारास फायदा होणार होता. या प्रकल्पाच्या उभारणीपासून पुढील २५ वर्षे देखभालीचा खर्च ठेकेदार करणार होता, त्यानंतर हा प्रकल्प हस्तांतरित होईल. एक हजार लीटर पाण्यासाठी ६३ रु पये मोजावे लागतील. चौथ्या वर्षापासून होलसेल प्राइस इंडेक्स (४५ टक्के) आणि कन्झ्युमर प्राइस इंडेक्स (५५ टक्के) या प्रमाणात दर ठरेल.