तहानलेल्या ठाण्याच्या जखमेवर चोळले मीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:12 AM2018-10-26T00:12:22+5:302018-10-26T00:12:25+5:30
मुंबईची तहान वर्षानुवर्षे भागवणाऱ्या ठाणे जिल्ह्याने भविष्यात नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांची तहान भागवावी, असा फतवा केंद्रीय परिवहन व जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी काढल्याने ठाणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
- नारायण जाधव
ठाणे : मुंबईची तहान वर्षानुवर्षे भागवणाऱ्या ठाणे जिल्ह्याने भविष्यात नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांची तहान भागवावी, असा फतवा केंद्रीय परिवहन व जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी काढल्याने ठाणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर अशी सर्वच शहरे भीषण पाणीटंचाईचा सामना करत असताना ३० हजार कोटी रुपयांची धरणे ठाणे जिल्ह्यात बांधून येथील लोकांना तहानलेले ठेवण्याचा गडकरी यांचा उफराटा न्याय कमालीचा अन्यायकारक असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या वर्षीच्या सुरुवातीलाच मुंबई उच्च न्यायालयाने पाणीटंचाईवरून ‘ठाणे जिल्ह्याचा मराठवाडा करणार का’, असे गंभीर भाष्य करून घोडबंदर पट्ट्यातील नव्या बांधकामांवर बंदी घातली होती. आता त्याच ठाणे जिल्ह्यावर गडकरी हे नाशिक-अहमदनगर या दोन जिल्ह्यांची तहान भागवण्याची जबाबदारी ढकलत आहेत.
सर्वच राज्यकर्त्यांनी पाण्याच्या बाबतीत ठाणे जिल्ह्याला सापत्न वागणूक दिली आहे. सध्या ठाणे जिल्ह्यात २२ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आदिवासी गावपाड्यांसह महानगरांना तहानलेले ठेवून मुंबईतील उत्तुंग टॉवर्संना मुबलक पाणी देण्यात येत असल्याने नागरिकांत संताप असताना गडकरी यांनी जिल्ह्यातील एक कोटी जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
ठाण्यात प्रचंड नागरिकीकरण होत आहे. शंभरच्या आसपास गावांतील शेती नष्ट होऊन औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरणामुळे सिमेंटचे जंगल वाढले आहे. सध्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या शहरांची पाण्याची गरज १३०७ दशलक्ष लीटर आहे. मात्र भातसा, तानसा, वैतरणा, बारवी, चिखलोली आणि शहाड-टेमघरमधून १२१२ लीटरच पाणी मिळत आहे. वाढते शहरीकरण आणि नव्याने होणाºया उत्तुंग वसाहतींमुळे या परिसरात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवत आहे. येथील राज्यकर्ते मात्र सुसरी, मुमरी, शाई, काळू, धरणाचे स्वप्न दाखवत आहेत. त्यासाठी २० वर्षांत त्यांना जमीन संपादित करता आलेली नाही. यामुळे ठाण्याचा मराठवाडा करणार का, ही न्यायालयाने व्यक्त केलेली भीती रास्त आहे.
ठाणे जिल्ह्यावर
अत्याचाराचा कहर / पान ३
>संभाव्य जलस्रोत
मुंबई महानगर प्रदेशाची भविष्यातील वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी पिंजाळ, गारगाई, सुसरी, काळू, कवडास, शाई, पोशीर ही जलसंपदा विभागाची प्रस्तावित धरणे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत आकार घेणार असून त्यासाठी ठाणे-पालघर जिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेतजमिनीसह वनजमीन जाणार आहे. हजारो शेतकरी भूमिहीन होणार असून लक्षावधी वृक्षांची कत्तल होणार आहे. हा सर्व आघात ठाणे-पालघर जिल्ह्यांवर होणार असून केंद्रीय मंत्री गडकरी ठाणेकरांना तहानलेले ठेवून नाशिक-अहमदनगरसाठी नव्या धरणांची काळजी वाहू लागले आहेत. ब्रिटिशकाळापासून मुंबई शहराची तहान ठाणे जिल्हा भागवत आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरलेली, पण ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिला, मुले हंडे-कळशा घेऊन पाण्याकरिता वणवण करत असल्याचे चित्र कित्येक वर्षे दिसत आहे. नितीन गडकरींच्या घोषणेनुसार ३० हजार कोटी रुपये खर्च करून नवी धरणे ठाणे जिल्ह्यात बांधल्यानंतर स्थानिकांना पाण्याकरिता वणवण करावीच लागणार, हे निश्चित आहे.