उल्हासनगरच्या दुरवस्थेला सलाम!
By admin | Published: March 12, 2016 02:03 AM2016-03-12T02:03:57+5:302016-03-12T02:03:57+5:30
उल्हासनगरच्या सोशिक नागरिकांना सलाम, अवैध बांधकाम करणाऱ्यांना सलाम, पाणी पळविणाऱ्यांना सलाम, तक्रारी करणाऱ्यांना सलाम
उल्हासनगर : उल्हासनगरच्या सोशिक नागरिकांना सलाम, अवैध बांधकाम करणाऱ्यांना सलाम, पाणी पळविणाऱ्यांना सलाम, तक्रारी करणाऱ्यांना सलाम... अशा शब्दांत उल्हासनगरचे महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आणि पालिकेचा कारभार चालवितानाची अगतिकताच एकप्रमकारे उघड केली.
राजकीय नेते, कथित समाजसेवक, दबाव आणणारे गट, तक्रारी करणारे अन्य अधिकारी-कर्मचारी या सर्वांचा यातून शेलक्या शब्दांत समाचार घेत त्यांनी आपल्या मनातील खळबळही एकप्रकारे व्यक्त केली. शहरातील टाऊन हॉलमध्ये ‘कायद्याने वागा’ संघटनेने गुरूवारी मंगेश पाडगावकरांच्या कवितांवरील कार्यक्रम ठेवला होता. त्यात पालिका आयुक्त मनोहर हिरे, पोलिस उपायुक्त वसंत जाधव, महापौर अपेक्षा पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनी मंगेश पाडगावकरांच्या कविता सादर केल्या. सुदेश मालवणकर यांनी कवी अशोक बागवे यांच्याशी गप्पा मारीत कवितेतील बारकावे उघड केले.
सलाम ही कविता पालिका आयुक्त मनोहर हिरे सादर केली खरी, पण ती करताना त्यांनी मनातील, शहरातील, वातावरणातील खळबळही मांडली. प्रश्न सोडवण्याऐवजी नगरसेवक आणि राजकीय पक्ष श्रेयासाठी पालिका प्रशासनावर तुटून पडल्याचे चित्र आहे. त्यातूनच निर्माण झालेली भावना मांडण्यासाठी आयुक्तांनी कवितेचा आधार घेतल्याची चर्चाही नंतर रंगली.