वीरपत्नींना ठामपाचा सलाम, नगरसेवकांनी दिले एक महिन्याचे मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:47 AM2019-06-15T00:47:03+5:302019-06-15T00:47:08+5:30
पुलवामा हल्ला : नगरसेवकांनी दिले एक महिन्याचे मानधन
ठाणे : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या महाराष्टÑातील संजय राजपूत आणिा नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांना शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या सर्वपक्षीय १३५ नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन मदत म्हणून दिली. यातून जमा झालेली २० लाख २५ हजारांची रक्कम दोन्ही कुटुंबीयांना विभागून देण्यात आली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मदतीचा धनादेश हुतात्म्यांच्या वारसदारांनी स्वीकारला.
आपल्या व आपल्या कुटुंबीयांची तमा न बाळगता प्रतिकूल परिस्थितीमध्ये जवान देशाचे रक्षण करण्यासाठी सदैव सीमेवर प्राणाची बाजी लावत असतात. त्यांच्यामुळेच आपण सर्व नागरिक सुरिक्षत राहू शकतो. देशसेवेत कार्यरत असताना काही वेळेला अनेक जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागते. त्यांचे बलिदान आपल्याला विसरून चालणार नाही. हुतात्मा जवानांच्या कुटुबीयांच्या सदैव पाठिशी राहणे हे आपले कर्तव्यच आहे. भविष्यातही या कुटुंबीयांना आपले सहकार्य मिळत राहील, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे नागरिकांना मूलभूत सेवा-सुविधा देणे हे काम असते, तसेच ठाणे महापालिका नागरिकांचा सर्वांगीण विकास होईल यादृष्टीने कार्यरत असत.े आज हुतात्म्यांसाठी कृतज्ञता म्हणून जो पुढाकार घेतला आहे तो निश्चितच प्रेरणादायी आहे. असा पुढाकार घेणारी ठाणे ही देशातील पहिली महापालिका आहे, असे कौतुकोद्गार पालकमंत्र्यांनी यावेळी काढले.
याप्रसंगी महापौर शिंदे, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के, भाजप गटनेते नारायण पवार तसेच सर्वपक्षीय नगरसेवक व महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच हुतात्मा जवान राजपूत यांच्या वीरपत्नी सुषमाबाई, शहीद जवान राठोड यांच्या वीरपत्नी वंदना आणि वीरमाता सावित्रीबाई राठोड उपस्थित होत्या.
पालकमंत्र्यांनी केले ठामपाच्या उपक्रमाचे कौतुक
हल्ल्यामध्ये हुतात्मा होणाऱ्या जवानांना केवळ श्रद्धांजली वाहिली जाते. ठामपाच्या सर्व नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन देऊ न त्यांच्या कुटुंबाला आधार दिल्यास ही खरी त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल, अशी सूचना सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी सर्वसाधारण सभेत मांडली होती. तिला महापौर मीनाक्षी शिंदे, सर्वपक्षीय गटनेत्यांनी सहमती दर्शविली, त्याबद्दल पालकमंत्र्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.