भिवंडीत साई मंदिराची संरक्षक भिंत समाज कंटकांनी तोडली
By नितीन पंडित | Published: November 24, 2022 04:09 PM2022-11-24T16:09:43+5:302022-11-24T16:10:06+5:30
तालुक्यातील वडघर गावात श्री साईबाबांचे मंदिर २०१३ रोजी बांधले असून २००३ पासून या मंदिराच्या बांधकामाचे काम सुरू असल्याचे साईचेरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
भिवंडी : भिवंडीतील वडघर ग्रामपंचायत हद्दीतील श्री साईबाबा मंदिराची संरक्षक भिंत समाजकंटकांनी तोडल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली असून या घटनेने पंचक्रोशीतील साई भक्तांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. याप्रकरणी श्री साई चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तालुक्यातील वडघर गावात श्री साईबाबांचे मंदिर २०१३ रोजी बांधले असून २००३ पासून या मंदिराच्या बांधकामाचे काम सुरू असल्याचे साईचेरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या साई मंदिरात वडघरसह पंचक्रोशीतील शेकडो नागरिक दर्शनासाठी येत असून हे मंदिर अनेकांचे श्रद्धा स्थान आहे. काही दिवसांपूर्वी या मंदिरातील दानपेटी चोरल्याची घटना घडली असून मंदिरासमोरील मोकळ्या जागेत चोरटे,मद्यपी व गर्दुल्ले रात्री अपरात्री येत असल्याने मंदिराच्या सुरक्षेसाठी ट्रस्टच्या वतीने मंदिर परिसरात संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू होते.
बुधवारी रात्री या भिंतीचे बांधकाम अज्ञात इसमांनी पाडले. या घटनेचे तीव्र पडसात गावात उमटले असून साई भक्तांमध्ये नाराजी पसरली असून साई मंदिराच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम पाडणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी श्री साई चॅरिटेबल ट्रस्ट वडघरच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका पोलिसांकडे केली आहे.