भिवंडी महानगरपालिकेवर समाजवादी पार्टीचे जल आक्रोश आंदोलन; शेकडो नागरिक सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 06:53 PM2022-06-08T18:53:35+5:302022-06-08T18:53:49+5:30
शहरातील फातमा नगर नूरी नगर, शांतीनगर, खंडू पाडा या भागात पाणी पुरवठा अनियमित होत असून अनेक विभागात मध्यरात्री नंतर पाणी पुरवठा केला जात असून त्या विरोधात नागरिकांमधून सतत ओरड होत आहे.
नितिन पंडीत
भिवंडी - महानगरपालिका लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ बुधवारी संपत असतांनाच समाजवादी पार्टी भिवंडी शहराध्यक्ष रियाज आजमी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर जल आक्रोश मोर्चा काढून पाणी समस्ये बाबत जोरदार घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन केले.
शहरातील फातमा नगर नूरी नगर, शांतीनगर, खंडू पाडा या भागात पाणी पुरवठा अनियमित होत असून अनेक विभागात मध्यरात्री नंतर पाणी पुरवठा केला जात असून त्या विरोधात नागरिकांमधून सतत ओरड होत आहे. शहरात नागरीकांसाठी समान पाणीपुरवठा धोरण राबवावे ,स्वच्छ पिण्याचे पाणी द्यावे ,काही ठिकाणी अस्वच्छ पाणी दिले जाते .स्टेम कडून मिळणारे ७५ एमएलडी पाणी हे शहरातील वेगळ्या नागरी वस्तीत दिले जाते ,तर अशुद्ध पाणी झोपडपट्टी विभागात दिले जाते ही गोरगरीब जनतेची फसवणूक होत आहे.तर शहरात शंभर कोटी रुपये खर्च करून केलेल्या पाणीपुरवठा योजनेतील १९ पैकी आज ही १४ पाण्याच्या टाक्या सुरू करण्यात प्रशासनास अपयश आले असून या बाबत तात्काळ निर्णय घेऊन प्रशासनाने पाणी पुरवठा सुनियोजित पद्धतीने होण्याची मागणी शहराध्यक्ष रियाज आजमी यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे .
यावेळी शहराध्यक्ष रियाज आजमीसह समाजवादीचे पदाधिकारी रियाज ताहीर,जावेद अन्सारी ,हमीद शेख ,फारुख अन्सारी ,आलमगीर खान ,जुबेर शेख ,सुग्गी देवी यादव यांचे शिष्टमंडळ आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ मुख्यालयात गेले असता त्यांना सुरवातीला आयुक्तांनी व्यस्तते मुळे भेट नाकारली असता शिष्टमंडळाने आयुकांच्या दालनाबाहेर बैठक मारून घोषणाबाजी सुरू केली .अर्ध्या तासाने अवघ्या काही मिनिटांसाठी वेळ दिल्यानंतर निवेदन स्वीकारून आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांचे समाधान केले .या प्रसंगी पोलिसांनी प्रवेशद्वारासह मुख्यालयात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .