भिवंडी महापालिका शाळांच्या दुरुस्तीसाठी समाजवादीचे शिक्षण मंत्र्यांना साकडे
By नितीन पंडित | Published: October 5, 2023 07:24 PM2023-10-05T19:24:22+5:302023-10-05T19:24:33+5:30
भिवंडी शहरातील बाराहून अधिक प्राथमिक शाळा इमारती या नादुरुस्त झाल्या असून त्यामुळे काही शाळा इमारती बंद करण्यात आल्या आहेत,तर काही शाळा इमारती लवकरच बंद होणार आहेत.
भिवंडी :भिवंडी महापालिका शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शाळा इमारतींची दुरावस्था झाली असून या शाळेमधील शिक्षण घेणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने या बाबींकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे याकरता समाजवादी पक्षाचे प्रदेश सचिव रियाज आजमी व भिवंडी शहरातील पक्ष पदाधिकारी माजी नगर सेवक फराज बहाउद्दीन बाबा, रियाज शेख,आलमगीर खान यांच्या शिष्टमंडळाने प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आसिम आजमी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत त्यांच्याकडे येथील शाळांच्य दुरुस्तीचा मुद्दा मांडला.
भिवंडी शहरातील बाराहून अधिक प्राथमिक शाळा इमारती या नादुरुस्त झाल्या असून त्यामुळे काही शाळा इमारती बंद करण्यात आल्या आहेत,तर काही शाळा इमारती लवकरच बंद होणार आहेत.त्यामुळे अशा शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या गरीब व कामगार वस्तीतील गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होण्याची चिन्ह दिसून येत असून विद्यार्थ्यांचे भविष्य चुकीच्या मार्गाने जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या सर्व बाबी लक्षात घेऊन भिवंडी पालिका हद्दीतील सर्व शाळा इमारतींची दुरुस्ती करण्यासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी या शिष्टमंडळाच्या वतीने रियाज आजमी यांनी केली आहे.
निज़ामपुर परिसरात असलेल्या पालिका शाळा इमारती धोकादायक झाल्याचे घोषित करून तेथील सुमारे १२०० विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये स्थलांतरीत केले आहे. त्या मुळे हे विद्यार्थी शाळेत जाण्यास तयार नाहीत . त्यामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती होत आहे अशी चिंता माजी नगरसेवक फराज बहाउद्दीन बाबा यांनी व्यक्त केली.
पालिकेची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असल्याने शाळा इमारती दुरुस्ती व नव्याने उभारण्यासाठी निधी नसल्याने शाळा बंद केल्या जाण्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्या साठी राज्य शासनाने इमारत उभारणी साठी निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी रियाज आजमी यांनी केली आहे. पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बेंचेस नाहीत,स्वच्छ पिण्याचे पाणी ,शौचालय या सुविधा मिळत नसल्याची तक्रार केली गेली.या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर लवकरच आपण भिवंडी शहराला भेट देऊन तेथील परिस्थिती समजून घेऊन शासनाकडून योग्य त्या निधीची तरतूद करू असे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिष्टमंडळास दिले आहे.