संभाजी भिडेंनी महिलांची माफी मागावी म्हणून ठाण्यातील पत्रकारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
By सुरेश लोखंडे | Published: November 4, 2022 10:04 PM2022-11-04T22:04:00+5:302022-11-04T22:04:11+5:30
येथील शासकीय विश्रामगृहासमोर या महिला पत्रकारांनी एकत्र येत भिडे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध केला.
ठाणे: टिकली लावण्याचे बेताल वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केवळ महिला पत्रकारांचीच नव्हे तर समस्त महिलांची माफी मागावी अशी मागणी येथील महिला पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात आज केली आहे.
येथील शासकीय विश्रामगृहासमोर या महिला पत्रकारांनी एकत्र येत भिडे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध केला. टिकली वरून सध्या सर्व स्तरातून मतमतांतरे व्यक्त होत असताना राज्यात सर्वप्रथम ठाण्यातील महिला पत्रकारांनी आपली भूमिका स्पष्ट करीत संताप व्यक्त केला आणि भिडे यांनी महिलांची माफी मागण्याची मागणी आज जिल्हाधिकारी यांचे लावून धरली. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन साकडे घातले आहे.
मंत्रालयातील २ नोव्हेंबरच्या घटनेविरोधात पत्रकारांनी एकत्र येत तीव्र शब्दात भिडे यांचा निषेध केला. महिला पत्रकार भिडे यांना प्रश्न विचारत असताना 'तू आधी कुंकू लावून किंवा टिकली लावून ये, मग तुझ्याशी बोलेन. स्त्री ही भारत माता आहे आणि भारत माता विधवा नाही असे गंभीर वक्तव्य केल्याचे पडसात राज्यात उमटत आहे. त्यास अनुसरून ठाण्यातील महिलांनी भिडे यांच्या या बेताल वक्तव्याचा खरपूस समाचार घेत तीव्र शब्दात निषेध केला आणि माफी मागण्याची मागणी आज लावून धरली.
टिकली लावावी की नाही हे प्रत्येक महिलेचे वैयक्तिक मत आहे. कपाळावरील टिकली टीकण्यापेक्षा महिलेची अस्मिता टिकणे गरजेचे आहे. सध्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे त्यांचे कर्तुत्व बघितलं गेलं पाहिजे,असे मत यावेळी काही महिला पत्रकारांनी व्यक्त करुन भिडे यांचा निषेध केला. यावेळी पत्रकार हेमलता वाडकर, प्रज्ञा म्हात्रे, जयश्री शेट्टी, रोहिणी दिवाण, अनुपमा गुंडे, सुचिता बिराजदार, सारिका साळुंखे, नम्रता सूर्यवंशी, संपदा शिंदे, अनघा सुर्वे, स्नेहा जाधव आदींनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन निवेदन दिले.