फोटो एकच, नावे वेगळी; १४१ सिमकार्डांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 12:12 PM2023-05-25T12:12:58+5:302023-05-25T12:13:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : एकच फोटो, मात्र नाव आणि पत्ते वेगवेगळे वापरून तब्बल १४१ सिमकार्ड विक्री केल्याप्रकरणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : एकच फोटो, मात्र नाव आणि पत्ते वेगवेगळे वापरून तब्बल १४१ सिमकार्ड विक्री केल्याप्रकरणी नवघर पोलिसांनी भाईंदर पूर्वेच्या दोन सिमकार्ड विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. बनावट फोटो व कागदपत्रांच्या आधारे ही सिमकार्ड वापरात आली आहेत.
केंद्र सरकारच्या दूरसंचार व दुरभाष्य संवाद विभागच्या वरिष्ठ उप महानिर्देशकांच्या साकीनाका कार्यालयातून बोलावणे आल्यावर मीरा भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या सायबर शाखेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष चव्हाण हे १६ मे रोजीच्या बैठकीसाठी गेले होते. या कार्यालयाने सिमकार्ड विक्रीबाबत केलेल्या तपासणीत काही सिमकार्ड विक्रेत्यांनी एकाच फोटोचा वापर करून वेगवेगळ्या नावे व पत्ता असलेल्या कागदपत्राद्वारे सिमकार्ड चालू करून ती विक्री केली असल्याचे आढळल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. सायबर शाखेने नवघर पोलिस ठाण्यात २० मे रोजी भाईंदर पूर्वेचे रामदेव कलेक्शन व ओम मोबाइलवर गुन्हा दाखल केला आहे.